Wednesday, 21 October 2015

...आणि पानिपत

आणि पानिपत....

हि एक समाजैतीहासिक कादंबरी. राजकीय इतिहासाच्या पार्श्वभूमीवर चितारलेली सामाजिक इतिहासाची कादंबरी.

वरुडे गावातील महार समाजाच्या चार पिढ्यांचा सामाजिक, सांस्कृतिक इतिहास लेखक संजय सोनवणी ह्यांनी तत्कालीन राजकीय इतिहासाच्या एक विस्तृत कालखंडाच्या पार्श्वभूमीवर चितारला आहे. साधारणता: शिवकालीन काळात शेवटच्या टप्प्यात हा इतिहासपट सुरु होतो. पुढे शिवरायांच्या स्वराज्याच्या न्याय्य आणि प्रजाहितदक्ष सामाजिक व्यवस्थेच्या आठवणी तेवढ्या उरत जातात. उत्तरोत्तर मराठेशाहीतील सामाजिक व्यवस्था कशी मोंगली रूप धारण करते आणि पेशवाईत अक्षरश: विषमतेचा कडेलोट होत जातो. त्या सामाजिक स्थित्यंतराचा हा विस्तृत काळपट. भिमनाक - रायनाक आणि येळनाक उर्फ हसन - सिदनाक - पुन्हा भीमनाक  असा हा चार पिढ्यांचा  सामाजिक इतिहास. सुमारे १०० वर्षांचा ह्या सामाजिक इतिहासाची सुरुवात शिवाजीमहाराजांच्या निधनाच्या आसपास होते आणि शेवट पानिपतावर!

औरंगजेब महाराष्ट्रात उतरतो आणि स्वराज्याच्या पडझडीला सुरुवात होते. संभाजीची हत्या, राजारामाचे पलायन, शाहू-येसूबाईला अटक अशा त्या कोसळत्या काळात मोगलांच्या वरवंट्याखाली स्वराज्याची व्यवस्था पार भरडली जाते. तरीही शिवाजीच्या प्रेरणेने भारलेला  माणूस त्या मोगलाइचे  आव्हान पेलून उभा राहतो. परंतु राजकीय व्यवस्था रंग बदलू लागते. एके काळी औरंगझेबाची झोप उडविणाऱ्या संताजी-धनाजीमध्ये यादवी माजते. शाहुच्या सुटकेने स्वराज्यामाध्येच अंदागोंदी माजते आणि शाहू-ताराबाई, सातारा-कोल्हापूर  अशी उभी फुट मराठेशाहीत पडते. त्याची परिणीती पुढे पेशवाईच्या वर्चस्वात होऊन शेवटी ह्या व्यवस्थेची शंभरी पानिपतावर भरते. असा साधारण राजकीय इतिहास आहे. कादंबरीत हा इत्यंभूत इतिहास दक्खन-महाराष्ट्रापासून ते उत्तरेत दिल्लीपर्यंत अवघ्या हिंदुस्तानच्या पार्श्वभूमीवर अत्यंत बारीकसारीक तपशिलासह वावरत असतो. ह्या राजकीय इतिहासाचा वापर एका पार्श्वभूमिसारखाच ठेवून लेखकाने त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सामाजिक इतिहासाची अत्यंत प्रभावी मांडणी केली आहे.

एकीकडे हिंदुस्तानांत  मोगल साम्राज्याचे विघटन. नवाब-निजाम-वजीर-उमराव ह्यांनी पोखरून काढलेले दिल्लीचे साम्राज्य. मुल्लामौलवीनि अब्दाली-नादीरशहा अशा परकीयांशी संधान बांधून नामधारी केलेलं दिल्लीच्या बादशहाचं तख्त. तर दुसरीकडे दख्खनेत नामधारी झालेलि मराठ्यांची छत्रपतीची गादी. पेशवा, सरदार-सुभेदार आणि ब्राह्मणी व्यवस्थेने नामशेष केलेलि शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना. दिल्लीपासून ते दख्खनेपर्यंत झालेलं हे राजकीय पानिपत. त्यातून निर्माण झालेली सामाजिक अनागोंदी, रयतेची लुटालूट, नासधूस...म्हणजेच सामाजिक पानिपत!

कादंबरी मुख्यत: वरुडे गाव, महारवाडा आणि गावकरी ह्यांच्या दैनंदिन जीवनावर बेतलेली आहे. गावातील पाटीलकी, त्या पाटीलकिसाठीची साठमारी, गावातील मोरबा बामण, बलुतेदारी, महार-येसकरी, त्यांची म्हारकी, भावकी...आणि ह्या सर्वांचा मिळून चाललेला गावगाडा... लेखकाने वरुड्यातील ह्या समाजव्यवस्थेला कादंबरीत मध्यवर्ती  स्थान दिले आहे. आणि ह्या गावगाड्याचे बदलत्या राजकीय व्यवस्थेने बदललेले रंगरूप ह्याचा ऐतिहासिक दस्तावेज म्हणजे ...आणि पानिपत.    


रायनाक महार हा कादंबरीतला मध्यवर्ती नायक. त्याचा बाप भिमनाक महार हे वरुड्यातील एक शहाणपण. शिवाजी राजांच्या काळातील महार समाजाच्या सामाजिक अधिकारांवर आणि त्याआधी बिदरच्या बादशाहने विठू महाराला बहाल केलेल्या सनदेवर भाष्य करणारा म्हातारा भिमनाक आणि पुढे  चिंध्या रामोशी आणि महार पोरांनी दरोडेखोरी चालू केली तेव्हा बदलत्या काळात त्याला पाठींबा देणारा भिमनाक, कादंबरीच्या सुरुवातीच्या काळातील  सामाजिक व्यवस्थेचा साक्षीदार असतो. ह्या भिमनाक महाराची पुढची पिढी म्हणजे त्याची दोन मुले रायनाक आणि येळनाक. हा रायनाक कादंबरीचा मूळ नायक असावा अशी त्याची मध्यवर्ती भूमिका आहे. कधीकाळी रायनाक संताजीच्या लष्करात पाइक होता. स्वराज्यासाठी शौर्याने लढताना तो जायबंदी होऊन पुन्हा गावात येउन म्हारकीची कामे इमानेइतबारे करतोय. जी धर्म व्यवस्था, जी समाज व्यवस्था रायनाकला पदोपदी तुडवत राहते तिच्याशी तो इमानदारीने निभावत राहतो. कधी बंड करून उठतो आणि आपल्या मित्राच्या बायकोवर वंगाळ नजर टाकणाऱ्या शिंप्याचा खून देखील करतो. कधीतरी दरोडेखोर बनायचं स्वप्न उरी बाळगतो. पण शेवटी त्याच्यातला माणूस ह्या क्षणिक हैवानीवर मात करून उरतो. त्याची बायको बाळंतपणात गुदरल्याने मेल्या भावाची बायको सिदनाकचा सांभाळ करताना रायनाककडे ओढली जाते. गावातही तशी कुजबुज चालते. पण ह्या दुनियादारीला रायनाक आपल्या जन्मजात  माणुसकीने जिंकून उरतो... कधी मोघली सैन्याचा मार खाऊनहि गावाशी बेईमानी न करणारा रायानाक.  कधी येळनाकने दिलेल्या अशर्फ्या महारवाड्याला जगविण्यासाठी वापरणारा रायानाक. कधी दुष्काळात गांजलेला रायनाक. चिंध्या रामोशी आणि महार दरोडेखोर पकडले गेले तेव्हा हकनाक मार पडलेला रायनाक. निजामाने गाव जाळलं तेव्हा ढसाढसा रडणारा रायनाक. पाटलाच्या मळ्यावर राबणारा  रायनाक. अशा अनेक रूपांत रायनाक महार कादंबरीत वावरतो आणि अश्रुनी भिजलेला इतिहास सांगत राहतो!

 दुसरीकडे ह्या सामाजिक पडझडीच्या काळात विषमतेला आव्हान देणारे आणखी एक स्थित्यंतर घडून येते. ते म्हणजे  रायनाकच्या भावाचे, येळनाकचे धर्मांतर. राजगडावरील लढाईत अशर्फिखान बहादुरीने लढणाऱ्या येलनाकला गिरफ्तार करतो. त्याला इस्लामच्या समानतेत आणतो आणि येळनाकचा हसन बनतो. हा अशर्फिखान सुद्धा मोरबा ब्राह्मणाचा बाटलेला चुलता अन्ता जीवाजी असतो. औरंगझेबाच्या मृत्युनंतर मोगली फौजेसोबत हसन मोगली साम्राज्यात परततो. मुस्लिम हसनला अमिना बिवी प्राप्त होते आणि बख्तियार नावाचा त्याचा शहजादा! कादंबरी इथे मुस्लिम धर्मांतराच्या विषयाला हात घालते. इस्लाम स्वीकारणारे अशर्फिखानासारखे सवर्ण हिंदू तसेच हसनसारखे दलित हिंदू ह्यांच्यामाध्यमातून तत्कालीन  हिंदू-मुस्लिम धर्मांतरे आणि त्यातील सामाजिक व्यवस्थेतील अभिसरणावर कादंबरी भाष्य करीत राहते.

ऊत्तरेत मोगल बादशाहीच्या धामधुमीत हसन एका महत्वाच्या लढाईत खुद्द जुल्फीकारखानाला ठार करण्याचा पराक्रम गाजवतो. अशर्फिखान हसनला त्याच्या लढाईच्या तंत्राबद्दल विचारतो तेव्हा हसन शिवाजीराजाची आठवण काढतो. शिवरायांच्या प्रजाहीताची वृत्ती हसन त्याच्या जहागिरीच्या कारभारात बाळगताना दिसतो. ह्याउलट त्याचा मुलगा बख्तियार अत्यंत अय्याश निपजतो. अशर्फिखान आणि सय्यद बंधूंशी संधान बांधून तर त्यांच्यानंतर नजीबखान रोहील्याच्या साथीने हसन आणि बख्तियार उत्तरेत नावारूपाला येतात. येळनाक उर्फ हसनच्या माध्यमातून कादंबरी उत्तर हिंदुस्तानातील आणि दिल्लीतील राजकीय आणि सामाजिक इतिहासावर भाष्य करते. त्यातून पुढे अब्दाली, मराठे शिंदे-होळकर, जाट-राजपूत-नवाब ह्यांचे राजकीय डावपेच आणि त्यातून घडलेले पानिपतचे युद्ध हा कादंबरीचा उत्तरार्ध आहे.

मराठेशाहीच्या अंतर्गत यादवीने, शाहुच्या मोगली मांडलीकत्वाने, पेशव्यांच्या बामणशाहीने शिवरायांच्या स्वराज्याच्या मुलभूत संकल्पनेलाच सुरुंग लागल्याने सामाजिक व्यवस्था पार ढेपाळत गेलेली असते. राजकीय व्यवस्था देखील तशीच अध:पतित होत जाते. गावगाड्यावर ह्या बदलत्या सामाजिक-राजकीय व्यवस्थेचे ओरखडे उठत राहतात. सत्तासंघर्ष, दुष्काळ, वतनदारी, आपसातील यादवी, वेठबिगारी, महारांचे नरबळी, तामाशाबाजी  अशा विविध स्तरांवर सामाजिक अध:पतन घडत राहते. दलितांच्या, महार समाजाच्या शोकांतिकेला तर पारावर उरत नाही. कधी काळी लष्करातील लढाऊ समाज आणि किल्लेदारीपर्यंत अधिकार असलेला हा वर्ग अक्षरश: विषमतेच्या खाईत ढकलला जातो. त्यांच्या हातातील शस्त्र काढून लष्करातील बुणगेगिरीची, प्रेते ओढण्याची हलकी कामे येतात. गावगाड्यात तर हे अध:पतन अत्यंत टोकाचे हिडीस रूप धारण करते. महारांच्या हक्कांचा प्रचंड संकोच होत जातो. अस्पृश्यता फोफावते. वेठबिगारी उग्र रूप धारण करते. समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्था दोन्ही स्तरावर महार-दलितांच्या नशिबी हे अध:पतन होत जाते.ह्या सामाजिक पानिपताचा  थेट महाराष्ट्रातून पार दिल्लीपर्यंत एका विशाल भौगोलिक आणि राजकीय परिप्रेक्षात वेध घेण्याचे काम कादंबरीने केले आहे.

गावातली पाटीलकी आणि त्यासाठीच्या काळेपाटील , पवारपाटील ह्यांच्यातील सत्तासंघर्ष देखील गावगाड्याच्या पाचवीला पुजलेली व्यवस्था. शाहू-ताराबाई संघर्षात भवानराव पाटील स्वत: रायनाकसोबत धनाजीजाधवला जाऊन मिळतो... आणि त्या खोट्या लढाईत भवानराव हकनाक बळी जातो. मराठ्यांच्या आपसातील बेबनावाचा असा फटका गावावर पडतो. पाटलाची बायको सती जाते तेव्हा  अवघ्या काही ओळीत लेखकाने सतीचा जो हृदयद्रावक थरार उभा केलाय...! ...अमृत पाटलाची बटिक चांगुणा आणि तिचा मुलगा संताजी. संताजी आणि भिमनाकची दोस्ती. चांगुणा एक म्हारीण. तिने केलेल्या फसवणुकीने पाटलाचे झालेले अध:पतन. ह्या सर्व मानवी भावभावनांचा गुंता कादंबरी उलगडत राहते.

एकेकाळी गावात ब्राह्मणी व्यवस्थेचा कट्टर समर्थक असलेला मोरबा ब्राह्मण स्वत:च ह्या सामाजिक पानिपताचा साक्षीदार आहे. त्याला हव्याशा वाटणाऱ्या ह्या राजकीय स्थित्यंतरातून जे सामाजिक आणि राजकीय अध:पतन घडत राहते त्याने मोरबा व्यथित होतो. एकेकाळी गावात नांदत असलेली माणसामाणसातील आपुलकी, सामाजिक सौहार्द्र लयाला जाऊन पेशवाईच्या बेगडी व्यवस्थेच्या ओझ्याखाली पिचत असलेल्या माणुसकीने मोरबा हादरून जातो. उतारवयात तो ह्या भटकुलशाहीविरोधात बंड करून उठतो. गावात सतीची चाल विरोध करून बंद पाडतो! त्यासाठी ब्रह्मवृंद मोरबालाच वाळीत टाकतो. मानवी भाव-भावनांना लेखकाने किती टोकावर नेउन ठेवलेय, ते कादंबरीच्या पानापानात जाणवत राहते.

रायनाकचा  मुलगा सिदनाक महार हा कादंबरीच्या सुरुवातीला अवतरतो खरा, परंतु तेव्हा म्हातारा झालेला रायनाक कथानकाचा ताबा घेत जातो. कादंबरीच्या शेवटच्या टप्प्यात पेशवाइतिल निघृण जातीय विषमतेच्या व्यवस्थेचा सिदनाक बळी ठरतो. शिवाशिविच्या बामणशाहीने पुण्यात महारांना सकाळ-संध्याकाळ फिरण्यास मज्जाव केलेला असतो. त्यात मोरबा ब्राह्मण निवर्तल्याचा सांगावा घेवून पुण्यात आलेला सिदनाकची सावली ब्राह्मणावर पडली. सिदनाकचा निघ्रून शिरच्छेद करून त्याच्या मुंडक्याचा चेंडू करून खेळवला गेला. शिवरायांच्या स्वराज्यातील सामाजिक सलोख्याचे आणि न्यायव्यवस्थेचे इथे खर्या अर्थाने पानिपत होते !

इतपत बदलत्या व्यवस्थेचे अन्याय सहन करून उभा राहिलेला रायनाक सिदनाकच्या ह्या अमानुष हत्येने पुरता कोसळतो. सिदनाकचा मुलगा भीमनाक बापाची वेडी धर्मनिष्ठा सोडून  आपल्या आज्जाच्या वळणावर गेलेला. रायनाक त्याला उत्तरेत येळनाककडे जाऊन धर्मांतर करण्याचा सल्ला देतो. स्वत: कितीही निष्ठेने ह्या धर्मव्यवस्थेत पिचून राहिलो तरीही शेवटी येळनाकने हसन होऊन जे धर्मांतर केले त्या निर्णयापुढे रायनाकने शरणागती पत्करली, ती अशी.

रायनाकचा नातू भिमनाक आपल्या बापाच्या खुनाचा सूड घेण्याच्या भावनेने पेटून उठतो. आयुष्यभर हिंदू राहून पिचत राहिलेला रायनाक त्याला मुस्लिम होण्याची प्रेरणा देतो. उत्तरेत हसन-बख्तियारकडे पाठवून देतो. भीमनाकचा बालमित्र पाटलाचा लेकावळा संताजी मराठी सैन्यात होता. त्याच्या ओळखीने भीमनाक आणि त्याची बायको सुंद्री दोघे उत्तरेत निघालेल्या भाऊच्या मराठी सैन्यात बुणगे बनून सामील होतात. ऐन पानिपतावर तो बालमित्रच सुन्द्रीला घेवून चक्क पळून जातो. भिमनाक अगतिक तरीही सुडाने पेटलेला.

भीमनाक आपला सूड उगविण्यासाठी भाऊची , पेशव्याची गर्दन मारण्याच्या तयारीत. त्यासाठी तो भाऊच्या शामियाण्यापर्यंत पोहोचतो पण... तसाच तो दुसरीकडे बख्तियारपर्यंत  पोहोचतो. त्याला मराठी लष्करातील खबरा पुरवतो. बख्तियारचाचा त्याला वापरून घेतो पण दोघांमध्ये कोणतीही आपलेपणाची भावना उरलेली नाही. बख्तियार म्हणजे येळनाक नव्हे. अमिरजादा बख्तियारलां  भिमनाक मध्ये स्वारस्य उरलेले नाही. काही ऋणानुबंध उरलेले नाहीत. तर भिमनाकलाहि बख्तियारचाचा आणि इस्लाममध्ये स्वारस्य उरलेले नाहीये.  मानवी भावभावनांचा हा कल्लोळ लेखकाने कादंबरीभर पेरून ठेवलाय...

अखेर पानिपत घडते. मराठी लष्कर उद्ध्वस्त होते. पखाल घेऊन फिरणारा भिमनाक देखील युद्धाच्या भीषणतेणे पुरता कोसळतो.  त्याच्या हाती जखमी भाऊ सापडतो. पण आता सूडच शील्लक राहिलेला नाही. माणुसकी पुन्हा एकदा सर्व अध:पतनातून जिंकून उरते. तो भाऊला वाचवतो. जीवावर खेळून यमुनापार करतो. महिनाभर त्याची सेवा करून भाऊला जगवतो. भाऊला त्याच्या सुडाची कहाणी सांगतो. भाऊ हेलावून जातो आणि क्षमा मागतो! पुरता हरलेला भाऊ मन:शांतीसाठी उत्तरेकडे निघून जातो.

मागे उरतो एकाकी भिमनाक... तसाच वरुड्यात एकाकी रायनाक...आणि उरते ते पानिपत, चार पिढ्यांच्या सामाजिक इतिहासाचे. ऐतिहासिक कादंबऱ्या  आपल्याकडे पेव फुटल्यासारख्या येतात. थोडा राजकीय इतिहास आणि त्यावर लेखकाने चढविलेला कल्पनाविष्कार हे त्याचे साधारण स्वरूप असते. पण इतिहास म्हणजे जणू काही राजेरजवाडे, वजीर-पेशवे, सरदार-सुभेदार, लष्करशाह आणि लढाया-युद्धे ह्यांचीच मक्तेदारी! पण सामान्य माणसाचाही इतिहास असतो...गावगाड्याचा, महारवाड्याचा आणि एकूणच समाजाचा इतिहास...! ह्या सामाजिक इतिहासाला प्राधान्य देऊन आणि त्याला राजकीय इतिहासाच्या पार्श्वभूमीवर रेखाटणारी हि कादंबरी. ह्या 'समाजैतिहासिक' वेगळेपणाने  '...आणि पानिपत' मराठी कादंबरीच्या विश्वात एकमेवाद्वितीय ठरते. मराठी कादंबरीतला एक मैलाचा दगड. ...आणि पानिपत.

...आणि पानिपत
लेखक : संजय सोनवणी
प्राजक्त प्रकाशन
मुल्य : ४००/-

Saturday, 12 September 2015

...आणि मग पुन्हा प्रा. शेषराव मोरेंना "कॉंग्रेसने आणि गांधीजीनी अखंड भारत का नाकारला?" सारखी सुंदर उपरती होईल

प्रा.शेषराव मोरे ह्यांचे "अखंड भारत का नाकारला?" हे संपूर्ण अभ्यासातून सिद्ध झालेले महत्वपूर्ण संशोधन आहे. प्रचंड सावरकरवादी असलेल्या मोरेंनी ह्या ग्रंथात अखंड हिंदुस्तान, फाळणी ह्या हिंदुत्ववाद्यांच्या, सावरकरवाद्यांच्या कळीच्या मुद्द्यावर अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण केलंय. काँग्रेस, गांधी-नेहरू, लीग, जिना, राष्ट्रवादी मुस्लिम, आझाद, बाबासाहेब, नेताजी इत्यादी सर्व घटकांना त्यांनी विस्तृत कव्हरेज देऊन आपले सिद्धांत पक्के मांडले आहेत. परंतु एक घटक ह्या ग्रंथात आश्चर्यकारकरित्या उपेक्षित राहिलाय, तो म्हणजे मोरेंचाच लाडका सावरकरवाद किंवा अखंडहिंदुस्तांवादी हिंदुत्ववाद!

त्यांच्या सध्याच्या वैचारिक गोंधळाला मोरेसमर्थक हिंदुत्ववादी 'विचारकलह' म्हणू शकतात. कारण मोरेमास्तर आधीच्या पुस्तकांत फाळणीला कॉंग्रेसला जिम्मेदार ठरवीत असत. पण पुढे त्यांनी फाळणीचा साद्यंत इतिहास अभ्यासला आणि सत्याच्या दिव्य प्रकाशात त्यांची बुद्धी दिपून गेली किंवा अक्षरश: वेड लागायची पाळी आली ( असं तेच म्हणतात) ...आणि मग "कॉंग्रेसने आणि गांधीजीनी अखंड भारत का नाकारला?" हि उत्कृष्ठ संशोधनात्मक साहित्यकृती प्रकाशित झाली.

अखंड हिंदुस्तान हा कळीचा मुद्दा असूनही प्रा..मोरेंनी आपल्या ग्रंथात  सावरकरवाद किंवा हिदुत्ववाद उपेक्षित का ठेवला हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याचा मागोवा घेतल्यास ह्या ग्रंथातून काही तथ्ये स्पष्ट होतात.

ह्या ग्रंथात सुरुवातीलाच स्वत:च्या अखंड भारताच्या भाबड्या आणि भावनिक समजुतीबद्दल प्रा. मोरे मनोगत व्यक्त करताना म्हणतात...
"...पूर्वी आम्हीही कडवे अखंड भारतवादीच होतो... फाळणी करून कॉंग्रेसने देशाचा घात केला असे मानीत होतो...आमच्या १९८८च्या ग्रंथात तसे स्पष्ट लिहिलंय...पण तेव्हा आमचा फाळणी विषयक अभ्यासच झाला नव्हता...!" इति. प्रा. मोरे
पृष्ठ क्र. ४ (अखंड भारत का नाकारला? (मनोगत))

हि स्पष्ट कबुली देणारे प्रा. मोरे समस्त सावरकरवादी हिंदुत्ववादी विद्वानांचे प्रतिनिधित्वच करीत आहेत हे सुज्ञांच्या लक्षात आलेच असेल.

आपल्या स्वतंत्र भारतात अखंड हिंदुस्तान आणि फाळणीबद्दल आत्यंतिक जाज्ज्वल्य वगैरे राष्ट्रभक्ती बाळगून असलेले जी मंडळी आहे त्यांच्यासाठी ह्या महत्वपूर्ण ग्रंथात प्रा. मोरे लिहितात...

"...काँग्रेस व्यतिरिक्त अन्य हिंदू संघटनांनी व व्यक्तींनी ( अर्थात संघ, हिंदू महासभा, सावरकर प्रभूती) फाळणीचा पर्याय म्हणून मांडलेल्या अखंड भारताविषयी एखादे प्रकरण ह्या ग्रंथात असावे असा काही अभ्यासू मित्रांचा (?) सल्ला होता. पण ग्रंथ मर्यादेमुळे (???) तसे न करता सामारोपातच त्याची दखल घ्यावी लागली...!"
पृष्ठ क्र. १६ (अखंड भारत का नाकारला? (प्रास्ताविक))

...आणि समारोपात हा हिंदुत्ववाद्यांच्या हिंदुस्तानचा अस्तित्वाचा प्रश्न अवघ्या दोनचार ओळीत गुंडाळूनही टाकतात...!

"...सावरकरांच्या अखंड भारताच्या योजनेत मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेत वाटा मिळणार होता... त्यानुसार आजच्या लोकसभेत सुमारे ३८% खासदार मुसलमान असते...आजच्या राज्यघटनेत मुस्लिमांसाठी एकही राखीव जागा नाही...आजच्या राज्यघटनेची कल्पनाही हिंदुत्ववादी करू शकले नव्हते... सावरकरांचे 'हिंदुराष्ट्र' हिंदूंसाठी घातक ठरले असते!..." इति. प्रा. मोरे.
 ("...सावरकरांचे 'हिंदुराष्ट्र' हिंदूंसाठी अघातक ठरले नसते!..." असं मोरेंचे मूळ वाक्य आहे. मी ते सरळ भाषेत लिहिलंय.)
पृष्ठ क्र. ६८३ (अखंड भारत का नाकारला? (समारोप))

आता पाचशे-हजार पानांच्या ह्या ग्रंथात ग्रंथ-मर्यादा कुठून उद्भवली? मुस्लिम लीग, राष्ट्रवादी मुस्लिम ह्यांच्यावर चार-चार प्रकरणे लिहित असताना हिंदुत्ववादी आणि विशेषत: सावरकरवादी भूमिकेवर एखादे प्रकरण तरी सहज बसवता आले असते! पण ती भूमिका मुळातच फोल, भोंगळ असल्याने कदाचित ह्या ग्रंथात आणखी विस्तृतपणे मांडायची तर स्वत:च्याच विचारप्रणालीचे वाभाडे काढावे लागले असते. म्हणून ते अवघड काम त्यांनी दोनचार ओळीतच आटपून टाकले असावे. "...अखंड भारत का नाकारला?" हि अशी एक सुंदर उपरती आहे.

अलीकडे प्रा. मोरेंच्या सावरकरप्रेमाने अंदमानात पुन्हा उचल खाल्ली किंवा पुन्हा 'विचारकलह' सुरु झालेला दिसतोय. ह्यावेळी सावरकरबदनामीसाठी त्यांनी पुरोगामी, काँग्रेस आदि घटकांना जिम्मेदार ठरवून वैचारिक गोंधळ घातलाय. त्यासाठी पुरोगामी विचाराची  दहशतवादाशी तुलना करून ते स्वत:  'पुरोगामी' , 'सेक्युलर' इ. शब्दांवरदेखील हिंस्त्र हल्ला चढविणाऱ्या कंपूचे म्होरके झाले आहेत. 

वरील विवेचनातून एक गोष्ट स्पष्ट होईल कि प्रा. मोरे पुरोगामी विचार, गांधी हत्या आणि सावरकरवाद ह्या विषयाचा संपूर्ण अभ्यास करतील तर पुन्हा विचारकलहातून त्यांची मते बदलु शकतील. पूर्ण अभ्यासांती सावरकरांच्या कथित बदनामीची अकथित केंद्रे प्रा. मोरेंना उलगडतील आणि दहशतवादाची केंद्रेही सापडतील. पुरोगामी विचाराचा लक्ख इतिहास पुन्हा त्यांची बुद्धी उजळून टाकील!... आणि मग प्रा. मोरेंना कदाचित पुन्हा एक सुंदर उपरती होईल.

Saturday, 5 September 2015

टीचर्स डे

पहिलाच दिवस होता, वसई पॉलीटेक्निकमध्ये आणि एपिएम (Applied Mechanics) शिकवायला देशमुख सर होते. मूर्ती लहान पण एकदम कडक, खरंतर चिडखोर स्वभावाचे सर होते. (अलीकडेच ते अपघातात गेले बहुधा.) :(

 तर पहिल्याच दिवशी सर काहीतरी शिकवीत होते. मी आणि बिपीन Mhatre पहिल्याच बेंचवर बसलो होतो. (दोघेही कॉलेजच्या एसेस्सिच्या मेरीट लिस्टमध्ये पहिल्या दोन नंबरवर होतो...! पण शाळेतल्या मेरीटच्या भव्यदिव्य आठवणींपेक्षा पॉलीटेक्निकचे तंत्रमय दिवस संघर्षाचे होते, बरं. ) लेक्चर चालू होतं आणि पाठीमागून कुणीतरी खोडसाळपणा केला... आणि इथेच माझी शाळेतली पारंपारिक खोड पुन्हा आडवी आली. म्हणजे मी हसलो. :)

 देशमुख सर आधीच चिडखोर. त्यात मी पुढे बसून दात काढतोय म्हटल्यावर त्यांचा पारा आणखी चढला. खाडकन माझ्या समोर आले, डेस्क वरची माझी नोटबुक घेतली आणि दिली क्लासबाहेर भिरकावून... हो, अक्षरश: हाकलून काढलं मला, वर्गातून...पहिल्याच दिवशी.

त्या देशमुखसरांच्या स्मृतींना टीचर्स डे निमित्त अभिवादन.

Thursday, 13 August 2015

३८ वर्षांची तपस्या आणि विश्वामित्री पवित्रा

३८ वर्षांची तपस्या आणि विश्वामित्री पवित्रा
विश्वामित्राच्या कठोर तपश्चर्येने घाबरून जाऊन स्वर्गाधिपती इंद्राने स्वर्गसुंदरी अप्सरा मेनकेला भूतलावर पाठवून दिले. मेनकेच्या मादक सौंदर्याने घायाळ होऊन तापसी विश्वामित्राचे चित्त विचलित झाले. ब्रह्मश्रीपदाचे विस्मरण होऊन आणि त्यासाठीची तपश्चर्या सोडून त्याने मेनेकेसोबत संसार थाटला. शकुंतलेचा जन्म झाला आणि मेनका स्वर्गलोकी परतण्यास निघाली. तेव्हा विश्वामित्राचे डोळे खाडकन उघडले आणि त्याला आपली तपश्चर्या भंग झाल्याचे लक्षात आले.
(हि कथा सर्वश्रुत आहेच. मात्र, त्यापुढे घडलेला प्रसंग असा:)
तेव्हा अत्यंत क्रोधायमान होऊन विश्वामित्राने शापवाणी उच्चारली:

विश्वामित्र: हे मेनके, तू माझी तीन तपांची तपश्चर्या भंग केलीस. मी तुला शाप देतो. ज्या सौंदर्याचा गैरवापर करून तू हे पापकृत्य केलेस ते तुझे स्त्री-सौंदर्य नष्ट होईल. कलियुगात तू मृत्युलोकी पुरुष जन्म घेशील आणि काळीकुरूप होशील. तुझे काळे तोंड आणि काळे धन घेवून तू मृत्युलोकी सैरावैरा पळत सुटशील.
ह्या शापवाणीने मेनका क्षणभर गांगरली. पण दुसर्याच क्षणी स्वत:ला सावरून तिने विश्वामित्राकडे उषा:प मागितला.

मेनका: हे राजर्षी, मी ह्या जन्मी आपली सेवाच केली. पुढील जन्मी मृत्युलोकी आपली सेवा करण्याची संधी द्यावी. मला उषा:प द्यावा.

विश्वामित्र: (निश्चयपूर्वक) कदापि नाही. ह्यापुढे तुला माझ्या राज्यात स्थान नसेल. तुझी रवानगी रसातळाला अर्थात आर्यावर्ताबाहेर दूर आंग्लदेशी पोर्तुप्रांती होईल.
ह्यावर सात्विक संतापाने मेनका क्रुद्ध झाली. आणि तिनेहि विश्वामित्राला प्रतीशाप दिला.

मेनका : हे राजन, तू माझ्या स्त्रीजन्माची कुचेष्टा केली आहे. माझ्या शापाने तू कलियुगात मृत्युलोकी स्त्री होशील... तू विश्वामित्री पवित्रा घेत स्वत:च्या राज्यात सैरभैर होशील...आणि मी ललितरूप घेऊन दूरदेशी राहूनदेखील तुझी तीन तपांची, ३८ वर्षांची तपस्या पुन्हा भंग करीन.

(काल्पनिक)

Wednesday, 24 June 2015

....विनोद तावडे ह्यांनी कोणती चूक केली?

विनोद तावडे ह्यांनी कोणती चूक केली?

 १९८० साली त्यांनी कथित ज्ञानेश्वर विद्यापीठात प्रवेश घेवून चार वर्षात तो तथाकथित इंजिनियरिंगचा कोर्स पूर्ण केला आणि ती डिग्री प्राप्त केली. 1963 साली जन्मलेले तावडे तेव्हा जेमतेम बारावी होऊन बाहेर पडलेले १७-१८ वयाचे एक विद्यार्थी असावेत. अशा गरजू विद्यार्थ्यांची कशी फसवणूक केली जाते ह्याचे तावडे हे खरंतर ज्वलंत उदाहरणच आहेत!

गेल्या वर्षी स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेविषयी गदारोळ मजला होता तेव्हा, ह्या विषयावर मी खालील पोस्ट टाकली होती:

"ओपन युनिव्हर्सिटी , Distant Education Courses, Correspondence Courses, ह्यांचा प्रचंड गैरवापर केला जात असल्याचे सातत्याने निदर्शनास येते. BA, B.Com सोडा, इंजीनियारिंगच्या B.Tech, B. E., B.Sc., M.Sc, M.Tech ते Ph.D. पर्यंतच्या सर्व शाखातील 'डिगऱ्या' स्वस्तात उपलब्ध आहेत.
ह्या तथाकथित विश्वविद्यालयांच्या शाखांमधून कोणत्या परीक्षा(?) घेतल्या जातात ते पाहाल तर खूप मनोरंजन होईल. अत्यंत हास्यास्पद, संतापजनक आणि भ्रष्ट असा हा उघड शिक्षणाचा बाजार शहरी भागात मांडला गेला आहे." इति.
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या शैक्षणिक पात्रतेच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुद्दा हा आहे कि इंजिनियरिंग, वैद्यकीय, तंत्रशिक्षण, विज्ञान इत्यादी महत्वाच्या क्षेत्रात घुसलेल्या या मुक्तशिक्षण घोटाळ्याचा पुनर्विचार व्हायला हवा.

मुळात ज्ञानेश्वर विद्यापीठासारख्या 'समांतर व्यवस्थेला' BE , BTech , ME , MTech , BSc , MSc ह्या उच्चशिक्षणाशी संबधित असलेल्या पदव्या अगदी शब्दश: जशाच्या तश्या वापरण्याची परवनागी कशी मिळते? त्यांच्या कोर्सच्या पदव्या वेगळ्या नावाच्या असायला हव्यात, जेणेकरून विद्यार्थ्याची आणि इतरांचीही फसवणूक होता कामा नये. पण हि धूळफेक जाणीवपूर्वक केली जाते कि काय हा खरा मुद्दा आहे! उदा. तावडे ह्यांना 'कोर्स इन इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग' वगैरे नावाची डिग्री द्यायला कुणाची हरकत नसावी. परंतु हटकून "BE डिग्री इन इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग" हा इंजिनियरिंगच्या मुख्य प्रवाहातीलाच शब्दप्रयोग वापरला गेला कारण तिथे धूळफेक अपेक्षित आहे.
हि समांतर विद्यापीठे अशा धूळफेकीसाठीच पैदा केली गेली असावीत. ह्या खोट्या डिग्र्या कुणाला उपयोगी पडतात? खासगी उद्योगजगतात अशा विद्यार्थ्यांना कोणताही स्कोप नाही कारण त्यांच्याकडे अपेक्षित ज्ञान, कौशल्य असण्याची सुतराम शक्यता नसतेच. मग ह्या डिग्र्या कुठे वापरल्या जातात? त्याचे उत्तर आहे सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रातील नोकऱ्या...! वेगवेगळ्या राज्यांच्या नावाने उत्पन्न झालेल्या अशा ज्ञानेश्वर विद्यापीठासारख्या युनिव्हरसीट्या ह्या काळ्याबाजारात फोफावल्या आहेत. BE , BTech , ME , MTech , BSc , MSc ह्या उच्चशिक्षणाशी संबधित असलेल्या पदव्या त्याच नावाने बहाल केल्या जातात. काही अंशी सरकारी मान्यता देखील असल्याने उदारतेने सरकारी नोकऱ्या, पदोन्नती इत्यादी साठी ह्या मुक्तडिग्र्या सढळहस्ते वापरल्या जातात. खासगी क्षेत्रातही थोडीफार धूळफेक होते, पण मुख्यत्वे शिक्षणाच्या ह्या काळ्याबाजाराचा डोलारा सरकारी नोकर्यांशी संबधित आहे.

चारचार वर्षाचे हे कोर्सेस फक्त दरवर्षी मोठी फीस भरून अटेंड केले जातात. कोणत्याही प्रकारची उपस्थिती, लेक्चर, प्रात्यक्षिक मुळातच अपेक्षित नसते. फक्त वर्षाच्या शेवटी नियमितपणे परीक्षा अटेंड (!)करायची, म्हणजे उत्तरपत्रिका भरायच्या कारण त्यावर कोणीही परीक्षक, पर्यवेक्षक वगैरे नसतोच. अशा प्रकारे चार वर्षाच्या फीसा भरल्या कि तुमची डिग्री तुमच्या हातात. असा हा प्रचंड मोठा घोटाळा आहे. मुख्य शहरे, तालुक्याच्या ठिकाणी हि शिक्षणाची गटारगंगा पाहायला मिळेल.
इंजिनियरिंगची डिग्री बाहेरून मिळवायची तर त्यासाठी AMIE नावाचा कोर्स उपलब्ध आहे. अगदी BE च्याच तोडीचा कोर्स. किती सरकारी बाबू AMIE करतात , हा संशोधनाचा विषय आहे. किंवा कितीजण ज्ञानेश्वर विद्यापीठ टाईप काळ्या डिग्र्या विकत घेतात हे पाहणे मनोरंजक असेल.

मुद्दा हा आहे कि ह्या तथाकथित विद्यापीठांना BE , BTech , ME , MTech , BSc , MSc हि नावे वापरायला बंदी घालायला हवी. त्यांच्या कोर्सेसना त्यांनी त्यांच्या विद्यापीठाची नावे द्यावीत. उदा. इलेक्ट्रोनिक्स इंजीनियरिंग कोर्स फ्रोम ज्ञानेश्वर युनिव्हरसिटी वगैरे. तसेच अशा तथाकथित डिग्र्याची सरकार दरबारी नोकऱ्या-पदोन्नती साठी गैरलागू ठरवायला हव्या.

तावडे नावाचा विद्यार्थी वयाच्या १७-१८व्या वर्षी जर ह्या १९८० साली ह्या घोटाळ्याचा शिकार झाला असेल तर आज कित्येक विद्यार्थी BE , BTech , ME , MTech , BSc , MSc ह्या नावाच्या वलयाने नागवले जात असतील? म्हणून खरा मुद्दा हा आहे कि इंजिनियरिंग, वैद्यकीय, तंत्रशिक्षण, विज्ञान इत्यादी महत्वाच्या क्षेत्रात घुसलेल्या ह्या मुक्तशिक्षण घोटाळ्याची हकालपट्टी व्हायला हवी, तावडेंची नव्हे!

Monday, 22 June 2015

हातभट्टीच्या दारूतून विषबाधा होण्याचे रहस्य काय

हातभट्टीच्या दारूतून विषबाधा होऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडल्याची घटना कालच घडली. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत हि घटना घडली. हि विषारी दारू ठाणे जिल्ह्यातून किंवा गुजरातमधून आल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या. ह्या पार्श्वभूमीवर हातभट्टीच्या दारूतून विषबाधा होण्याचे रहस्य काय असा प्रश्न उभा राहतो.
महागडी देशी-विदेशी दारू न परवडणारा गरीब मजूर वर्ग गल्लीबोळातील हातभट्टीच्या दारूचा ग्राहक आहे. त्यामुळे हातभट्टी अर्थातच बेकायदेशीर असूनही तिचा मोठा पारंपारिक उत्पादक-ग्राहक वर्ग देशात अस्तित्वात आहे, हे वास्तव आहे. त्याची उत्पादनाची पद्धत गावठी तरीही वैज्ञानिक म्हणजेच उर्ध्वपातन म्हणजेच डीस्टीलेशनच आहे.

पारंपारिक हातभट्टीमध्ये उसाची मळी किंवा (काळा गुळ) आणि नवसागर (अमोनियम क्लोराइड NH4Cl )हे मिश्रण काही दिवस आंबवून त्याचे उर्ध्वपातन केले कि गावठी दारू तयार होते. ह्या 'पिव्वर दारू'त विशिष्ठ प्रमाणात पाणी मिक्स करून दारूचे उत्पादन ग्राहकांना उपलब्ध होते. ग्रामीण भागात आणि शहरी गल्लीबोळात हीच गावठी दारू बहुधा उपलब्ध असते. हातभट्टीच्या त्या मिश्रणात संत्री, मोसंबी, आंबा, जांभूळ, इत्यादी फळे टाकल्यास त्या त्या फळाच्या अर्काची चव प्राप्त होते.
मोह किंवा जांभळे टाकून उत्तम प्रतीची दारू बनविली जाते आणि दारूतले दर्दी शौकीन ह्या दारूला 'इंग्लिश दारू'पेक्षाही उच्च दर्जाची मानतात!
मग प्रॉब्लेम कुठे येतो? तर मोठ्या प्रमाणत (हजारो लिटर) ह्या हातभट्टीच्या दारूचे उत्पादन करणारे जे मोठे व्यावसायिक निर्माण झाले आहेत, त्यांनी ह्या दारूच्या उत्पादनाच्या पारंपारिक पद्धतीत लबाड्या करायला सुरुवात केली. त्यासाठी रसायनांचा भडीमार केला जाऊ लागला. युरिया सारखे खत आणि ब्याटरिची (सेल) पावडर देखील हातभट्टीत वापरले जाऊ लागले. अर्थात पारंपारिक उर्ध्वपातनाच्या शास्त्रात आधुनिक रसायनशास्त्राने मोठी घुसखोरी केली... आणि त्यातून विषारी रासायनिक दारूची प्रकरणे गेल्या काही वर्षात उद्भवली.
हातभट्टीच्या दारूत अलीकडे मिथेनॉल ह्या रसायनामुळे प्रचंड जीवघेणी विषारी भेसळ सुरु झाली. हे मिथेनॉल का वापरले जाते?

वर उल्लेख केल्यानुसार उर्ध्वपातनातून निर्माण झालेल्या 'पिव्वर दारू'त विशिष्ठ प्रमाणात पाणी मिक्स करून गावठी दारू ग्राहकापर्यंत पोहोचत असे. नेमका इथे मिथेनॉलने खेमिकल लोचा केला. ह्या 'पिव्वर दारू'त फक्त दोन थेंब मिथेनॉल टाकल्यास सुमारे सातपट जास्त गावठी दारू तयार होऊ लागली! 'थेंबाची दारू' ह्या नावाने हि मिथेनॉलदारू ओळखली जाते. आता खेडोपाडी आणि गल्लीबोळातून हे मिथेनॉल संशोधन पसरल्याने छोटेमोठे हातभट्टीवालेहि सर्रास मिथेनॉलदारूचे उत्पादन करू लागले. त्यातून मिथेनॉलचे 'थेंबाचे' प्रमाण साहजिकच अनियंत्रित होऊ लागले. मिथेनॉलच्या अनियंत्रित वापराने गावठी दारूचे जीवघेण्या विषारी दारूत रुपांतर होत गेले. ह्या विषारी मिथेनॉलदारूचे दुष्परिणाम मुंबईतील मालवणी येथील दुर्घटनेतून पुन्हा उघड झाले.

अर्थात, ह्या गावठी दारूच्या धंद्यावर (तो बेकायदेशीर असल्याने) बंदी आणून हा प्रश्न सुटेल हे फक्त स्वप्नरंजन आहे. हातभट्टीची हजारो वर्षांपासून परंपरा आहे आणि आजही ती टिकून आहे कारण त्याचे मागणी आणि गरजचे अर्थकारण. ग्रामीण (आणि शहरीही) भागातील मोलमजुरी करणाऱ्या फाटक्या लोकांना कायदेशीर कारखान्यातील दारू उपलब्ध आणि परवडणार असेल तर प्रश्नच नाही, परंतु तेही संपूर्ण दारूबंदिसारखे स्वप्नरंजनच आहे. एकीकडे दारूवर प्रचंड कर लादून ती महागडी करून टाकायची, दारूची कारखानदारी वाढवायची आणि दुसरीकडे गरीब श्रमिकांच्या श्रमपरीहाराला विषारीरसायनयुक्त जीवघेणं बनवायचं, ह्या मूर्खाच्या नंदनवनातून बाहेर येण्याचा उपाय काय?

Thursday, 26 March 2015

विश्वचषकातील भारतीय संघाच्या पराभवाचे गुन्हेगार कोण?

पोस्टमार्टेम रिपोर्ट
विश्वचषकातील भारतीय संघाच्या पराभवाचे गुन्हेगार कोण, हा आजचा कळीचा मुद्दा आहे. एकही सामना न हरणारी टीम इंडिया तब्बल १०० धावांनी का पराभूत झाली? त्याची कारणे तपासून पहिली तर काही चुका स्पष्ट दिसून येतात.

यादव-शमिने १० षटकात ५० धावा देऊन वॉर्नरचा महत्वाचा बळी घेऊन छान सुरुवात केली. पण नंतरच्या गोलंदाजांनी (अश्विन, जडेजा, मोहित) २० षटकांत फक्त गोलंदाजीच्या पाट्या टाकल्या. मधल्या ओव्हर्समध्ये जेव्हा फलंदाज आक्रमक नसतात तेव्हा आपल्या वाट्याच्या ओव्हर्स खपवून बाजूला होणारे गोलंदाज काय कामाचे ? ३५व्या षटकात परत येउन यादवने स्मिथचा बळी घेतला तोपर्यंत ओस्ट्रेलियाच्या २०० धावा फलकावर लागल्या होत्या. उर्वरित १५ षटकांत ते हाणामारी करून धावांचा डोंगर रचणार हे स्पष्टच दिसत होते.

तसेच फलंदाजीत रोहित आणि शिखरने छान सुरुवात करून दिल्यावर आणि तद्नंतर शिखर, विराट, रोहित हे स्टार फलंदाज पाठोपाठ बाद झाल्यावर रैना, जडेजा हि लोअरमिडलऑर्डर राहणे-धोनीसोबत उभी राहिली नाही. हा भारतीय संघातील ठळक लूपहोल होता, जो आजच्या महत्वाच्या सामन्यात उघडा पडला.
साखळी फेरीतील सामन्यात आपल्या टीम मधले हे कच्चे दुवे बदलण्याची गरज होती. सुरुवातीचे सामने जिंकल्यानंतर आणि क्वार्टरफायनलमध्ये जागा पक्की झाल्यांवर आपल्याकडे दोन सामने उपलब्ध होते. त्यात हि कमजोर कडी बदलता आली असती. हि कमजोर कडी म्हणजे रवींद्र जडेजा होता, हे स्पष्ट होते. एकतर फिरकी गोलंदाज म्हणून तो प्रभावी ठरत नव्हता आणि फलंदाज म्हणून त्याच्याकडून कामगिरीची अपेक्षाही नव्हती. संघ जिंकत असल्याने हि कमजोरी उघड होत नव्हती आणि ते छुपं ठेवण्यातच संघव्यबस्थापनाने चूक केली.

इंडिया क्वार्टरफायनलमध्ये पोहोचली तोपर्यंतची कामगिरी पाहता जी धोक्याची घंटा वाजत होती ती कुणी लक्षात घेतलि नाही. भारताची फलंदाजी मुख्यत: रोहित, धवन, कोहली ह्या स्टार फलंदाजांवर अवलंबून आहे. त्यातला एकहीजण खेळला तर आपली धावसंख्या चांगला आकार घेते. पण ते जर लवकर तंबूत परतले तर आपली तळाची फलंदाजी कशी ढेपाळते ते वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यातही पाहायला मिळाले होते. मोजक्या धावांचे आव्हान असूनही रैना, जडेजा हे मधल्या फळीतले फलंदाज खेळपट्टीवर उभे राहू शकले नाहीत. उसळत्या चेंडूवर त्यांची फलंदाजी अक्षरश: उघडी पडताना आपण नेहमी पाहतो. अर्थात, पुढच्या बाद फेरीत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया ह्या मातब्बर संघांसमोर त्यांची काय अवस्था होईल त्याचा विचार करता, संघात काही बदल अपेक्षित होते.

पहिले चार फलंदाज आणि यादव, शमी हे द्रुतगती गोलंदाज हि आपली बलस्थाने आहेत. कर्णधार धोनी स्वत: एक वादातीत शक्तीस्थान आहेच. पण भारतीय संघात एक चेन्नई सुपरकिंग्स नावाचा उपसंघ आहे. धोनी आणि त्याचे शिलेदार (अश्विन, जडेजा,रैना, मोहित) हा तो उपसंघ. पैकी अश्विन सध्या बरी स्पिन टाकत होता. मोहित शर्मा मूळ संघात नव्हता, तरीही तो मिळालेल्या संधीचे सोने करीत होता. रैनादेखील खेळपट्ट्या फलंदाजीस पोषक असल्याने चांगली कामगिरी करीत होता.

पण प्रश्न होता जडेजाच्या लोअर मिडलऑर्डर फलंदाजीचा आणि पाचव्या गोलंदाजाचा. हि संघातील कमजोर कडी होती. परंतु त्या उपसंघाचा आपसात किती विश्वास असतो ते जडेजाने जेव्हा रिव्ह्यू मागितला तेव्हा दिसले. धोनीला खात्री नसूनही केवळ जाडेजाच्या आग्रहाखातर त्याने तो रिव्ह्यू कसा घेतला ते पाहता, चेन्नई सुपरकिंगच्या खेळाडूंसाठी संघाला दुय्यम महत्व दिले जाते कि काय, अशी शंका घ्यायला जागा आहे.
खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असेल तर जडेजाची स्पिन अयशस्वी ठरल्याने जाडेजाच्या जागी अक्षर पटेलला खेळविणे गरजेचे होते. किंवा खेळपट्टी जर तेज गोलंदाजीला पोषक असेल तर भुवनेश कुमारला चौथ्या बॉलरच्या स्वरुपात संघात घेऊन आक्रमणाची धार वाढविता आली असती. तसंही गेल्या दोन वर्षातील तो भारताचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज असूनही त्याला दुर्लक्षित ठेवून काय साध्य झाले? किंवा बिन्नीला संधी देवून त्याच्या फलंदाजीचाही तळाला फायदा करून घेत आला असता. किवा कदाचित इशांत शर्माच्या जागी बदली खेळाडू घेतला गेल तेव्हाच अनफिट जाडेजाच्या जागी युवराजसिंगचा विचार करण्याची संधी होती, ती संघ-व्यवस्थापनाने दवडली. इथेही सीएसके कनेक्शन संघाच्या आड आले असंच दिसून येईल. आज जेव्हा एक विकेट लवकर पडल्यावर ओस्ट्रेलियाने १८० धावांची मोठी भागीदारी केली तेव्हा भुवि किंवा अक्षरसारखा विकेटटेकिंग गोलंदाज महत्वपूर्ण ठरला नसता काय?

तसेच रैना हाणामारीच्या षटकांत निर्णायक फटकेबाजी करू शकतो. पण चार विकेट लवकर पडल्या तर वरच्या क्रमांकावर त्याची हतबलता पाहता एक्स्ट्रा फलंदाज खेळवून रैनाला खालच्या क्रमांकावर आणणे गरजेचे होते. मग आपल्याला पाचव्या क्रमांकावर रायुडूला घेऊन आणि रैनाला सहाव्या क्रमांकावर पाठवून फलंदाजीची खोली वाढवता आली असती का? ते दोघे मिळून १० षटके टाकतील तर ते शक्य झाले असते. तसंही रैनाने मागच्या एक सामन्यात एकट्यानेच १० षटके टाकली होती. म्हणजेच आज गरज असताना रायुडूच्या स्वरुपात आपल्याला पाचव्या क्रमांकावर एक विश्वासार्ह फलंदाज मधल्या फळीत मिळाला असता आणि रैना तळाला सहाव्या क्रमांकावर धोनीसोबत मोठे फटके खेळू शकला असता.
असे असताना भूवीच्या स्विंग वर विश्वास का ठेवला नाही ? किंवा अक्षर पटेलच्या प्रभावी फिरकीचा ऑप्शन का वापरला गेला नाही? किंवा बिन्नीच्या अष्टपैलू खेळाचा पर्याय का चाचपडून पहिला नाही?
खरंतर रायुडूच्या रूपाने एक अधिक फलंदाज घेऊन रैना आणि इतरांच्या गोलंदाजीचा पर्याय सर्वाधिक उपयुक्त ठरला नसता?

पण बादफेरीत पोहोचल्यावरही उर्वरित दोन सामन्यात वरीलपैकी कोणताही बदल न करून संघव्यवस्थापनाने नक्की काय साधले? ह्या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट आहे आणि ते म्हणजे भारतीय संघावर असलेला अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा. जी टीम जिंकतेय तिच्यात मुळीच बदल करायचा नाही, ह्या सुपरस्टीशनच्या आहारी कोण गेले होते, ते स्पष्ट व्हायला हवे. आपले आजीमाजी दिग्गज खेळाडूदेखील ह्या अंधविश्वासाच्या जाळ्यात पूर्वापार फसलेले असतात. ह्या सुपरस्टीशनच्या प्रभावामुळेच संघात आवश्यक बदल केले गेले नाहीत, असंच दिसते. संधी असूनही तसा प्रयोगदेखील केला गेला नाही.क्रिकेट हा माईंडगेम, प्रेशरगेम , टेम्परामेंटगेम वगैरे असतो. पण व्यावसायिकता सोडून आपला संघ असा अंधश्रद्धाळू बनला. मग तिथे प्रोफेशनल ओस्ट्रेलियाच्या पुढे असल्या भोंगळ संघाचा कसा निभाव लागणार? अर्थात टीम इंडियाचे संघव्यवस्थापन म्हणजेच कर्णधार धोनी, रविशास्त्री, आदि तज्ञमंडळी ह्या पराभवाचे खरे गुन्हेगार आहेत.