औरंगजेबाच्या
धूर्त आणि मुरब्बी राजकारणाचा अंत झाल्यानंतर मराठेशाहीला आसेतुहिमाचल
काही विशेष आव्हान उरले नव्हते हे पुढील काळात मुघलांच्या ढासळत गेलेल्या
साम्राज्यावरून सिद्ध होते.
मराठेशाहीने औरंगजेबाशी संभाजी आणि
राजाराम ह्यांच्या नेतृत्वाखाली प्रदीर्घ २० वर्षांच्या धामधुमीच्या काळात
आपले अस्तित्व जिवंत ठेवण्यात यश मिळविले होते. त्यानंतर मात्र ताराबाईने
आपल्या तडफदार नेतृत्वाने औरंगझेबाला त्याच्याच
मुघल साम्राज्यात चढाई करून खडे चारले. औरंगझेबाच्या मृत्यूने मुघल पराभूत
होऊन महाराष्ट्रातून परतले. इथून पुढे ताराबाईच्या महत्वाकांक्षेला
अक्क्ख्या देशाचे रान मोकळे मिळाले होते.
मात्र इथेच घडले एक विलक्षण राजकारण. शाहूची सुटका!
मुघलांच्या ह्या मुत्सद्दी राजकिय खेळीने मराठेशाही पुरती दुभंगली,
नेस्तनाबूत झाली. मुघलांच्या पडझडीच्या काळातही मराठे देशामध्ये आपले
अस्तित्व टिकवण्याच्या पलीकडे निर्णायक भूमिका कधीही घेऊ शकले नाहीत. मुघल
सत्तेच्या म्हणजेच दिल्लीच्या बादशहाच्या मांडलिकत्वच्या मानसिकते मध्येच
मराठे पुढील अत्यंत अनुकूल काळात सातत्याने वावरत असल्याचे दिसते.
मोगलांच्या उतरत्या काळातही एकमेव आव्हान किंवा प्रतिस्पर्धी असलेली
मराठेशाही प्रभावहीन झाली होती. त्यामुळे शाहू, सातारा, कोल्हापूर, पुणे,
पेशवे, शिंदे, होळकर इ. मराठी नेतृत्व शिवरायांचा स्वराज्यवादी विजीगिषु
मराठी बाणा विसरून गेले. शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा सिद्धांत त्या
मांडलिकत्वच्या मानसिकतेने बाद झाला होता असे दिसते.
शाहू-ताराबाई
संघर्ष, सातारा-कोल्हापूर संघर्ष, पेशवे-छत्रपती संघर्ष, पानिपत,
शिंदे-होळकर संघर्ष आणि पुढे ब्रिटिशांचे मांडलिकत्व ह्या दुष्टचक्रात
मराठेशाही सातत्याने गुंतून राहिली. मराठेशाही देशाला निर्णायक नेतृत्व
देऊन शकली नाही.
ह्यांचे मुलभुत कारण म्हणजे मुघलांचे शाहूची
सुटका करण्याचे दूरदर्शी, मुत्सद्दी आणि यशस्वी राजकारण. मुघलांच्या त्या
राजकारणाचे योग्य ते मूल्यमापन आपण स्वकीय, स्वधर्मीय अस्मितेच्या
मोहाने करत नाहीत , एवढेच.
शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या सिद्धांताची प्रेरणा आणि त्याची ताकद मराठ्यांना
औरंगजेबासारख्या तत्कालीन जगातील सर्वश्रेष्ठ अशा महाबलाढ्य बादशाहाला २५
वर्षाचा प्रदीर्घ आणि अत्यंत प्रतिकूल काळातील लढा देण्यास सतत प्रवृत्त
करीत होती. राजा असो कि नसो, सैन्य-सामुग्री असो कि नसो; मराठ्यांना
स्वराज्याची स्फूर्ती सातत्याने त्या सिद्धांतातून मिळत होती.
परंतु शाहुच्या सुटकेमुळे
हे समीकरण बदलून गेले. मुघलांचे मांडलिकत्व पत्करलेला आणि तरीही गादीचा
वारस असलेला शाहू परतल्याने मराठेशाहीमध्ये प्रचंड उलथापालथ झाली.
ताराबाईचे महत्व कमी होणे साहजिकच होते परंतु त्याहीपेक्षा महत्वपूर्ण होते
ते मराठ्यांचे मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारणे.
पुढील काळात
मराठेशाही मध्ये अंदागोंदी माजून आपसातील संघर्षामध्ये मराठे मागे
पडल्याचेच दिसते. निजाम फोफावण्यास कारणीभूत ठरला तो हाच कालखंड. दख्खनेतील
सुभेदार, उत्तरेतील सुभेदार, पूर्वेतील नवाब, कलकत्त्यातील ब्रिटीश आणि
इतर सत्ताकेंद्रे मुघलांच्या वर्चस्वातून स्वतंत्र सत्ताकेंद्रे स्थापित
होत असताना २५ वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यात मुघलांचा निर्णायक पराभव करणारी
मराठेशाही मात्र ह्या अनुकूल परिस्थितीचा फारसा फायदा उठवू शकली नाही.
उलटपक्षी ह्या काळात अंतर्गत संघर्षात मराठेशाही विस्कळीत होत गेली आणि इतर
सत्ताकेंद्रांच्या स्पर्धे पुरते अस्तित्व तिचे राहिले.
शाहुच्या सुटके ने दोन महत्वपूर्ण गोष्टी घडल्या:
१. मराठ्यांची आक्रमकता ताराबाई-शाहू अशा अंतर्गत संघर्षात वाया गेली.
मुघलांशी २५ वर्षे दिलेल्या यशस्वी लढ्याची परिणीती अंतर्गत कलहात होऊन
मराठ्यांचा मुघलसंघर्ष मागे पडला.
२. शिवरायांच्या हिंदवी
स्वराज्याच्या सिद्धांताला शाहुच्या मुघल-मंडलीकात्वाने छेद दिला. त्याचा
परिणाम म्हणजे पुढील काळात मराठे दिल्लीच्या बादशहाच्या अंकित असलेली
दुय्यम भूमिका देश पातळीवर वठवीत राहिले.
शिवरायांचा हिंदवी स्वराज्याचा सिद्धांत मराठे उत्तरोत्तर पुरते विसरून गेल्याचे दिसून येते.