आज गुढीपाडवा. शालिवाहन (सातवाहन) शके १९३६ प्रारंभ.
सातवाहन घराण्यातील तेविसावा राजा गौतमीपुत्र सातकर्णी ह्याने इ.स. ७८ मध्ये शक क्षत्रप नहपान ह्याचा निर्णायक पराभव करून सातवाहन साम्राज्याला पुन्हा वैभव प्राप्त करून दिले. त्या महान विजयाचा विजयोत्सव म्हणजेच गुढीपाडवा. ह्या विजायोत्सवानिमित्त गौतामिपुत्राने शालिवाहन शक सुरु केला.
ह्या सातवाहन घराण्याचे साम्राज्य आपल्या महाराष्ट्राच्या मायभूमीतून निर्माण झाले होते. तसेच आंध्र आणि कर्नाटक प्रांतावारही सातवाहनांचा प्रचंड प्रभाव होता. त्यांची राजधानी प्रतिष्ठान (आजचे पैठण) इथे होती. इ.स.पूर्व २३० ते इ.स. २२० अशी ४५० वर्षे इतका प्रदीर्घ काळ वैभवशाली सातवाहन साम्राज्य देशभर विस्तारले होते. परंतु शक, यवन आक्रमक सातवाहन साम्राज्यास आव्हान देत असताना गौतमीपुत्र सातकर्णी ह्या पराक्रमी राजाने परकीय आक्रमकांना पराभूत करून सातवाहन साम्राज्यास पुन्हा वैभव प्राप्त करून दिले.
त्रिसमुद्रतोयपितवाहन (ज्याच्या सैन्याचे घोडे तिन्ही समुद्रांचे पाणी प्याले आहेत) आणि शकयवनपल्लवनिसुदन (शक, पल्लव आणि यवन ह्यांचा नयनाट करणारा) अशा पदव्यांनी गौतमी पुत्राला गौरविण्यात आले आहे.
सातवाहन सम्राट हाल ह्याने गाथा सप्तशती हा महाराष्ट्री प्राकृतातील (आद्य मराठी) काव्यग्रंथ लिहिला. मराठी भाषेतील साहित्य रचना २००० वर्षापूर्वी पासून अस्तित्वात असून मराठी भाषेचे अभिजातत्व सिद्ध करण्याचे कार्य हालाची 'गाथा सत्तसई' हि साहित्यकृती करीत आहे.
अर्थातच गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा दिवस म्हणून आजही २००० वर्षानंतर महाराष्ट्रातच साजरा केला जातो.
मराठी बहुजन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णीचा विजय असो!
सर्वाना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment