Monday, 23 December 2013

मोदींच्या सभेचा रिपोर्ट

 23/12/2013 (फेसबुक पोस्ट)

काल पुन्हा मोदींचे भाषण ऐकायचा योग जुळून आला. रविवार असल्याने चिकन बिर्याणीवर आडवा हात मारून जरा कुठे आडवा होवून भारत-आफ्रिका टेस्ट पाहत होतो तर मुंबईत मोदीगर्जना सभा सुरु झाली.

मस्त धमाल येणार म्हणून पाहू लागलो तर आधी नमनाला घडाभर तेल तसे मुंडे, गडकरी, फडणवीस इ. मंडळी बोल बोल बोलत सुटले. नंतर राजनाथ सिंग ह्यांनी त्यांचे कीर्तन-प्रवचन आळविले. शेलार नामक कुणी अध्यक्ष बसलेल्या चिरक्या आवाजात आपली हौस भागवीत होतेच. कंटाळवाण्या होत चाललेल्या सभेला मोदी कधी एकदा आग ओकतात त्यात खरे स्वारस्य होते. मलादेखील!

सभेला बाहेरून ट्रेनने आणलेल्या दोन अडीच लाख लोकांची विक्रमी गर्दी होती. सामान्य गरीब श्रोते रणरणत्या उन्हात तर श्रीमंत श्रोते मंडपात अशी वर्णाश्रम पद्धतीची रचना शोभून दिसत होती.

देशाच्या राजकीय आणि सामजिक हिताचे खालील अत्यंत महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले.

१. सुरुवातीलाच छत्रपति शिवराय, फुले-शाहू-आंबेडकर हि पुरोगामी नावे घेवून आणि सावरकर, हेडगेवार, गोळवळकर, ठाकरे ह्या हिन्दुत्वाच्या अर्ध्वर्युना अन्नुलेखानेच मारल्याने त्यांनी तथाकथित हिंदुत्वाच्या फुग्याला जीवघेणी टोचणी लावली. तसेच व्होट फॉर इंडिया अशी घोषणा दिल्याने इंडिया शायनिंग च्या कटु आठवणि चाळविल्या गेल्या. तसेच हिंदुस्तान, हिंदू राष्ट्र इ. सुसंस्कृत भाषेचे प्रेम असलेल्या हिंदू राष्ट्रवादी संस्कृतीरक्षक मंडळींचा जीव टांगणीला लावला.

२. गुजरात आणि महाराष्ट्र ह्या राज्यांची निर्मिती एकाच दिवशी होवूदेखील आज पर्यंत गुजरातचे फक्त १४ तर महाराष्ट्राचे तब्बल २६ (!) मुख्यमंत्री झाले (?) त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाचा बट्ट्याबोळ झाला असल्याचा नवा गणिति सिद्धांत त्यांनी मांडला.

३. चले जाव चळवळीच्या धर्तीवर त्यांनी काँग्रेस चले जाव चा नारा दिला! ब्रिटीश सरकारशी १९४२ साली चले जाव चळवळीत काँग्रेसच लढत होती तेव्हा संघ आणि हिंदुत्ववादी कोणते उद्योग करीत होते ह्याबाबत ते पुढील सभेत नवीन संशोधन मांडणार आहेत असे समजते !

४. वंशवाद, संप्रदायवाद संपविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने संघ-भाजप मध्ये अस्वस्थता पसरली . तसेच भ्रष्ट्राचार मुक्त भारत च्या घोषणे मूळे व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या पोटात गोळा आल्याचे लक्षात आले.

५. गुजरात आणि महाराष्ट्र ह्यांच्यामधील प्रगतीची प्रचंड दरी त्यांनी त्यांच्याकडील जगप्रसिद्ध अमेरिकन आकडे वारीसाहित सिद्ध करून दाखविली!

६. सरदार पटेलांचे त्यांनी यशस्वी राजकीय अपहरण केले आहेच. त्यांचा दाखला देवून त्यांनी भाषावार प्रांत रचनेवर देशात फुट पडल्याचे टीकास्त्र सोडले! मराठी भाषिक राज्यासाठी जीवाचे रान करणारे त्यांच्याच मंडळीनि नाक दाबून बुक्क्यांचा मार सहन केल्याची चर्चा आहे.

७. वन्दे मातरम ने सभेची शेवट करताना श्रोते पळून गेल्याने व्यासपीठावरून नेतेमंडळीनि घोषणा देवून खिंड लढविली. तरीही नेहमीप्रमाणे वन्दे, वन्दे ,वन्दे असे चढत्या फ्रीक्वेन्सीने बडबडून त्यांनी शेवटी सभेला रंगत आणलीच !

मध्यंतरी बिर्याणीच्या अमलाखालि अमळ डोळा लागल्याने मोदिपुराणातिल थोड्याश्या अध्यायाना मुकलो त्याचा मला खेद आहे! तसेच इतिहास संशोधन हा विषय त्यांनी ह्यावेळी कटाक्षाने टाळला त्यामुळे माझ्यासारख्या इतिहासप्रेमी ची घोर निराशा झाली.

अहो आश्चर्यम! मोदी नावाची मुलुख मैदानी तोफ अगदीच फुसकी निघाली कि काय ? !

Saturday, 21 December 2013

देवयानी खोब्रागडे केसच्या निमित्ताने

21/12/2013 (फेसबुक पोस्ट)

कायद्याने देवयानी केसमध्ये जे व्हायचे ते होईलच. अमेरिकेचे कायदे आपण त्या देशात पाळले च पाहिजेत अन्यथा त्याची शिक्षा होईलच. तसेच देवयानीवर देखील अन्याय होता कामा नये म्हणूनच भारतीय राजनीतिज्ञ स्त्री अधिकारी म्हणून भारत सरकारने तिच्या पाठीशी खंबीर राहायची भूमिका घेतली आहेच.
त्याच न्यायाने आमच्या देशात भारत सरकारचे कायदे चालतात , अमेरिकेचे नव्हे हे देखील लक्षात असू द्या. त्या कामवाल्या बाईचे कुणी नातेवाईक (नवरा-मुले) आमच्या देशाच्या भूमीवरून तुम्ही कोणत्या कायद्याने पळवून नेलीत त्याचे आधी उत्तर द्या.


शोषण हा जर मुद्दा केला जात असेल तर भारतीय विद्वानांनी आधी त्या मोलकरीण बाई ला किती पगार दिला जात होता,किती अपेक्षित होता त्याचे आकडे डॉलर आणि रुपयाच्या किमतीत आम्हा सामान्य नागरिकांना सांगावेत . म्हणजे मुंबईत महिन्याला चार घरची धुणीभांडी करणाऱ्या आमच्या ३-४ हजार रुपये कमाविणाऱ्या शोषित महिलांना तरी ह्या शोषणाचा नक्की अंदाज येईल, काय?


 ह्या घटनेच्या निमित्ताने दिसून आलेले काही मत प्रवाह:
१. 'खोब्रागडे' बाई ना त्यांच्या आर्थिक-सामाजिक-राजकीय पार्श्वभूमीच्या आधारे पूर्वग्रहदुषित दृष्टीने आरोपीच्या पिंजर्यात उभे करून त्यांचे आरक्षणत्व, त्यांची उच्चविद्या विभूषित नवश्रीमंती, त्यांचे आणि तीर्थरुपांचे 'आदर्श' मधील कथित भ्रष्टाचार, इ. असंबद्ध बाबींना झोडपणारे मतप्रवाह.
उदा. लोकसत्ता.
२. एका भारतीय व्यक्तीला अमेरिकेने कायद्याचा बडगा दाखविल्याने देशाभिमान दुखावलेल्यांचा मतप्रवाह उदा. IBN लोकमत
३. एका दलित मागासवर्गीय स्त्रीवर अन्याय झाल्याने धार्मिक भावना दुखावलेल्यांचा मतप्रवाह. उदा. फेस्बुकीय स्टेटस
४. निवडणुका आणि मतपेट्या डोळ्यासमोर ठेवून भूमिका घेणारा मतप्रवाह उदा. राजकीय पक्ष
५. वरिल भुमिकांचि सरमिसळ असलेले बुद्धिवादी विचारवंतांचे मतप्रवाह.
६. नक्की काय खरे आणि काय खोटे ह्याच्या संभ्रमात सापडलेला 'आम आदमि' उदा. मी (आपण )

Wednesday, 18 December 2013

झाडूवाल्यांचा दिल्लीतील जोर का झटका

18/12/2013 (फेसबुक पोस्ट)

देशातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलून गेली कि काय असे सुखद वातावरण तयार झाले आहे.
अण्णा हजारे कुठलाही झगमगाट न करता राळेगणला उपोषण करतात.
गर्दी नाही, देशभक्तीपर गाणी नाहीत, टोप्या-झेंडे नाहीत, घोषण-गर्जना नाहीत, सिलीब्रेटी नाहीत!
उपोषणाला सरकार त्वरित प्रतिसाद देते. लोकपाल बिल राज्यसभेत मांडते. काँग्रेस, राहुल गांधी कमालीची पोझीटीव भूमिका घेतात.
राज्यसभेत भाजप संपूर्ण सहकार्याची भूमिका काय घेते आणि बिल एका दिवसात पास पण होते!

इमानदारी कि भी कोई हद होती है भाई!

गेल्याच वर्षी ह्याच्या अगदी उलटे चित्र देशभर होते.
जंतरमंतर कि रामलीला वरच्या टीम अण्णा चे अद्भुत देशव्यापी आंदोलन.
कॉंग्रेस च्या कपिल सिब्बल, मनीष तिवारी ह्यांची सत्तेची उद्दाम माजोरडी वक्तव्ये.
तब्बल १३ दिवस ताणलेले ऐतिहासिक उपोषण.
रामदेव-अग्निवेश ह्यांचे घुमजाव आणि अण्णा-केजरीवाल ची काहीशी दुराग्रही, हेकेखोर भाषा !
शेवटी कोन्ग्रेस, भाजप सहित सर्व विरोधी पक्षांनीहि अण्णांच्या तोंडाला पाने पुसली आणि लोकपाल नेहमीच्या राजकीय कुट नीतीने बारगळले !

मग आता अचानक हे अद्भुत परिवर्तन सर्वच स्तरावर का दिसून येत आहे? ह्या बदलाचे रहस्य काय आहे?

अर्थातच आम आदमी पार्टीचे दिल्ली निवडणुकीतील गौरवशाली यश हेच ते रहस्य आहे.
कॉंग्रेस चे समजू शकतो कि त्यांनी चार राज्यात सपाटून मार खाल्ला आहे म्हणून त्यांची अक्कल ठिकाणावर आली आहे.
परंतु टीम अण्णा आणि भाजप ह्यांचे खरे कौतुक करायला हवे.

अण्णा आंदोलनातून बाहेर पडलेल्या केजरीवाल ने जो भीम पराक्रम गाजवला त्यामुळे टीम अण्णाला लोकपाल सदृश्य काहीतरी यश आपल्या पदरात पडणे हि काळाची गरज ठरली. त्यातून हा समजूतदारपणा , शहाणपण आला नसेल तर नवलच!

चार राज्यात कॉंग्रेसला चारी मुंड्या चित करूनही दिल्लीतील आम आदमी पार्टी च्या धडाक्यासमोर भाजपची हि पुरती भंबेरी उडून गेली. केजरीवाल खरा हिरो ठरला, मोदी नव्हे! निवडणुकीचा संपूर्ण फोकस, श्रेय आम आदमी पार्टीने हिरावून घेतल्याने सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी गोची कमळाबाईची झाली. सांप्रत काळी लोकपाल ला विरोध करून आम आदमीच्या विषाची परीक्षा नको हा व्यवहारी सल्ला त्यांच्या चाणक्यांनी पक्षाला दिलेला दिसतोय!

एकूणच झाडूवाल्यांचा दिल्लीतील जोर का झटका धीरे से सबको लग रहा है !
भारतीय जनता सुद्न्य आहे आणि लोकशाहीचाच विजय निश्चीत आहे!

Monday, 9 December 2013

दिल्लीचा निवडणुकांच्या निकालाचे परिणाम

09/12/2013 (फेसबुक पोस्ट )

दिल्लीचा निवडणुकांच्या निकालांनी भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे:
भाजप : ३३%
आम आदमी पार्टी : ३०%
कॉंग्रेस: २५%

मागील निवडणुकीत आम आदमी पार्टी अस्तित्वात नव्हती तेव्हाची आकडेवारी खालीलप्रमाणे:
भाजप : ३६ %
कॉंग्रेस: ४० %

दिल्लीत आम आदमी पक्षाला भरघोस मतदान झाले असून दोन्ही प्रस्थापित पक्षांची मतदान टक्केवारी कमी झाल्याचे दिसून येते.
सक्षम नवीन पर्याय उपलब्ध असल्यास जनता प्रस्थापित पक्षांच्या सरंजाम शाहीला झुगारून देण्यास कटिबद्ध असल्याचे सिद्ध झाले आहे.
आम आदमी पार्टी ला लोकांनी भरगोस मतदान करून भारतीय जनतेचा कौल स्पष्ट केला आहे. लोक नव्या दमाच्या, उमेदीच्या, विचाराच्या राजकारणासाठी मतदान करणार हे दाखवून दिले आहे. प्रस्थापित सर्वच पक्षांना हा स्पष्ट इशारा आहे.

काँग्रेस आणि भाजप व्यतिरिक्त विश्वासार्ह पर्यायाच्या शोधत भारतीय जनता आहे ह्यावर शिक्का मोर्तब झाले आहे.

आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल ह्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना शेवटच्या क्षणी अडचणीत आणणारे अण्णा हजारे आणि टीम अण्णावाले विचारवंत तसेच स्टिंग ऑपरेशन करणारे मिडीयावाले ह्यांची तोंडे पाहण्यासारखी झाली असतील. समाज सुधारणेच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारणारे लोक ते काम कुणीतरी इमानदारीने आणि आपल्यापेक्षाही अधिक हुशारीने करतोय म्हटल्यावर किती संकुचित आणि दळभद्री वागू शकतात हे दिसून आले. ह्या सर्वाना मतदारांनी आपली ताकद आणि अक्कल दाखवून दिली आहे.

तिसर्या आघाडीच्या पर्यायी व्यवस्थेला पुन्हा एकदा धुमारे फुटणार हे येत्या काळात दिसेल.

काँग्रेस वाल्यांचा सुपडा साफ झाल्याने राहुल गांधी सोडून दुसरा कोण अशी चर्चा सुरु झाली आहे.
आळस सोडून इमानदारीत मेहनत करावी लागणार हे सत्ताधारी पक्षाला स्पष्ट समजले आहे. लोकांना गृहीत धरून चालणार नाही. भाजपच्या जातीयवादाचा बागुलबोवा दाखवून लोकांना आपल्याशिवाय कुणी वाली नाही अश्या भ्रमात राहून चालणार नाही हे देखील स्पष्ट झाले आहे.

मोदी नावाची कोणतीही लाट अस्तित्वात नाही आणि धर्माच्या नावाखाली कोणतेही ध्रुवीकरण इ. शक्य नाही हा स्पष्ट संदेश भाजप-संघ वाल्यांना दिला गेला आहे. पुढील काळात त्यांना आपली जातीय-धार्मिक डावपेचावर आधारित समीकरणे बदलणे भाग आहे.

दिल्लीच्या जनतेने तमाम भारतीय जनतेला, आणि एकूणच भारताच्या राजकारणाला नवीन दिशा दाखविली आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत ह्या नव्या समीकरणांचा प्रभाव दिसून आल्याशिवाय राहणार नाही.

Thursday, 5 December 2013

OBC-बौद्ध धर्मांतर: मुद्दे आणि गुद्दे



OBC च्या बौद्ध धर्मांतराचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. त्याचा विचार करता काही मुद्दे मांडावेसे वाटतात.

धर्मांतर काही विशिष्ठ नियमात कायदेशीर ठरविले गेले आहे हि वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कुणी बौद्ध व्हावे , कुणी ख्रिश्चन व्हावे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा  वैयक्तिक अधिकार आहे. तसे स्वातंत्र्य घटनेने भारतीय नागरिकास प्राप्त झाले आहे.
धर्म किंवा धर्मांतर हे  विज्ञानयुगातील लोकशाहीतील आधुनिक मानवाच्या जीवनात काही विशेष बदल घडवू शकतील का, हा चिकित्सेचा विषय आहे. तरीही धर्मांतर ह्या विषयाचा उहापोह होणे गरजेचे आहे.

अलीकडील काळात भारतात ख्रिश्चन धर्मांतराचे प्रमाण सर्वाधिक असावे असा माझा अंदाज  आहे.
हिंदू, मुस्लिम , जैन, शीख इ. धर्म धर्मप्रसाराच्या बाबतीत बऱ्यापैकी उदासीन असावेत असेही म्हणायला हरकत नसावी. बौद्ध धर्म धर्मांतराच्या विषयात अतिशय जागृत आहे हेदेखील स्पष्ट आहे. अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवाच्या ऐतिहासिक धर्मांतराची त्यास पार्श्वभूमी आहे!

ख्रिश्चन धर्माचे धर्मांतर हे एक जागतिक स्तरावरील अभियान असल्याने त्याची व्याप्ती आणि परिणामकारकता सर्वाधिक आहे हे सत्य आहे. तम-मन-धन ओतून ख्रिश्चन धर्मीय धर्मप्रसाराच्या कार्यात वाहून घेतात असे दिसून येते. 

ईशान्य भारत, केरळ, ओरिसा-आंध्र किनारपट्टी, दुर्गम आदिवासी प्रदेश, कोकण किनारपट्टी, इ. ठिकाणी ख्रिश्चन धर्मियांनी मोठ्या प्रमाणात  धर्मांतर घडवून आणले आहे हि वस्तुस्थिती आहे. ते त्यांचे धर्मप्रसाराचे यश आहे. प्रसंगी त्यासाठी त्यांना मोठी किंमत देखील चुकवावी लागली आहे.

मुंबईत ख्रिश्चन धर्मप्रसाराच्या लागलेल्या काही जाहिराती विषयी सध्या गदारोळ उठला होता. फेसबुकवर देखी चर्चा झाल्या परंतु कुणी  ख्रिश्चन धर्मीय तिथे विरोधासाठी उभा राहिला असे दिसत नाही. त्या जाहिरातीचे काय होईल ते पुढील काळात दिसेल परंतु सामाजिक सहिष्णुता किंवा सौहार्द कायम राहिल्याचेच दिसून येते. 

धर्मांतराने कुणाचे सामाजिक, आर्थिक जीवनमान सुधारत असेल आणि त्यासाठी लोक स्वखुशीने धर्मांतर करीत असतील तर ती एक नैसर्गिक प्रक्रियाच समजावी लागेल.

महत्वाचे हे आहे कि धर्मप्रसार करणार्यांनी ह्या सामाजिक सलोख्याच्या  जाणिवेचे पालन करणे अत्यावश्यक आहे. धर्मांतर घडवून तुम्ही स्वधर्माचा फायदा तर इतर धर्माचे नुकसान करीत असता हा साधा व्यवहारी नियम आहे. समोरच्या धर्माच्या अस्मितेला धक्का पोहोचणार नाही ह्याची जबाबदारी देखील लक्षात घाय्याला हवी. तरच धर्मांतर सहजशक्य होईल अन्यथा अस्मितेसाठी पेटून उठलेला समाज आपल्या तुमच्या धर्मप्रसाराला खीळ घालू शकतो, हा सरळ हिशेब आहे.

हे समजून घेऊनच  ख्रिश्चन धर्मियांनी  धर्मप्रसाराचे कार्य यशस्वी केले आहे असे सिद्ध होते.

आमच्या गावातील काही मंडळी अलीकडे ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना इ. साठी जात असल्याचे दिसून येत होते. धर्मांतराची ती सुरुवातीची प्रोसेस असावी. गावातील एक तरुण 'नेता' त्यासाठी पुढाकार घेत होता. काही दिवसांनी गावकर्यांनी ह्याला विरोध केला, लोकांचे प्रबोधन केले आणि हे धर्मांतर टळले !

तसेच शेजारील गावातील एक कुटुंब धर्मांतरित झाले आहे, स्वखुशीने! त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारून घरातील पूर्वीचे देव काढून टाकले.  परंतु समाजातील लोकांशी ते संबंध ठेऊन आहेत. कुठलाही गाजावाजा नाही कि काही समारंभ नाही, अवडंबर नाही. कुणाला त्यांच्या धर्मांतराविषयी  फारसे कळतही नाही कारण त्यांनी आपले जुने  नाव देखील कायम ठेवले आहे.

OBC -बौद्ध धर्मांतराविषयी हिंदू धर्म (?) किंवा समाज ज्याचे धार्मिक नुकसान होतेय, तो कमालीचा उदासीन आहे. हिंदू धर्माचे  तथाकथित धर्मगुरू ह्या विषयावर ब्र देखील काढताना दिसत नाहीत. तसेच स्वघोषित हिंदू धर्म संघटना, हिंदू राजकीय पक्ष, इ. मुग गिळून गप्प बसल्याचे चित्र आहे. हि उदासीनता आहे कि मग्रुरी आहे, कि सोयीस्कर दुर्लक्ष आहे कि जाणीवपूर्वक कारस्थान आहे ह्याचीदेखील चिकित्सा व्हायला हवी. धर्मलंडानि आपापले कोर्ट-खटले, कर्मकांडे, इ. मधून वेळ काढून आपली भूमिका स्पष्ट करायला नको का

OBC च्या बौद्ध धर्मांतराच्या निमित्ताने सध्या रान उठविले जात आहे. फेसबुक देखील त्यात आघाडीवर आहे. ह्या धर्मांतराचे सर्वेसर्वा श्री. हनुमंत उपरे हे आहेत. त्याला श्री. संजय सोनवणी ह्यांनी दैनिकात तसेच फेसबुकवर लेख लिहून ह्या धर्मांतरास  विरोध केला होता. त्या निमित्ताने काही बौद्ध धर्मियांनी फेसबुकवर श्री. सोनवणी ह्यांच्या विरुद्ध शिवीगाळ करायची एक मोहीमच उघडली. एखाद्या व्यक्तीचे आपल्या समाजाप्रती असलेले योगदान विसरून धर्मांतराला विरोध (मुद्द्यावर आधारित) केला म्हणून त्याला अश्लाध्य टीकेचे लक्ष करण्याची हि प्रवृत्ती कुतघ्नतेची नाही का?

इथेच ह्या तथाकथित धर्मांतराच्या वैचारिकतेचि मर्यादा स्पष्ट होते. इथे धर्मांतर हा मुद्दा आहे कि त्या निमित्ताने दळभद्री राजकारण करून आपापली पोळी भाजण्यात काही मंडळीना रस आहे हा प्रश्न देखील उपस्थीत  होतो! OBC -बौद्ध धर्मांतर हा खरच मुद्दा असेल तर संबधित धर्मप्रसारकांनी ख्रिश्चन धर्माकडून आदर्श घ्यावा. अन्यथा, ह्या धर्मांतराचे जे अवडंबर माजविले जात आहे  त्याला आमच्या आगरी भाषेत मांजरांच 'हिकाट' कमी आणि गोंगाट जास्त असे म्हणतात.

धर्मांतर हा विषय यशस्वीपणे हाताळणारे एकमेव भारतीय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. तत्कालीन धर्मातील विषमता आणि सामाजिक अन्याय ह्याविरुद्ध बंड करून  त्यांनी एका समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तो क्रांतिकारक मार्ग स्वीकारला होता.  परंतु आजच्या लोकशाहीच्या आणि विज्ञान युगाच्या एकविसाव्या शतकात त्या महामानवाने धर्मांतर हाच विषय राबविला असता? कि त्या दृष्ट्या नेत्याने समाजाला कोणती दिशा दिली असती, कोणता नवा विचार दिला असता ह्याविषयी आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे!

राकेश पाटील

Wednesday, 27 November 2013

समाजातील अभिजनवर्ग आणि त्यांच्या सामाजिक जाणीवा.

समाजातील अभिजनवर्ग आणि त्यांच्या सामाजिक जाणीवा.

अलीकडे लता मंगेशकर ह्यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाची  बातमी वादग्रस्त झाली होती. 
लताबाई नि नरेंद्र मोदी ह्यांना बोलाविले आणि ते पंत-प्रधान व्हावेत अशी मनीषा जाहीर केली. त्यांनी हिंदुत्ववादी, सावरकरवादी  विचारसरणी स्वीकारावी किंवा मोदींचे गुणगान गावे हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. मुद्दा हा आहे कि अशा प्रसंगी व्यासपीठावर साधारणपणे राजकीय-पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवण्याची प्रथा आहे. बातमी मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे देखील व्यासपीठावर असल्याचे दिसते. त्या हॉस्पिटलसाठी राज्य सरकारने केले सहकार्य लक्षात घेता
मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार ह्यांची उपस्थिती असणे उचित ठरले असते. प्रचलित रिवाजाला फाटा देऊन मंगेशकरांनी 'चूक' केली हेच दिसून येते.

दुसऱ्या एका बातमीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या स्मारकासाठी शिवसेनेने मा. पवारसाहेबांना पुढारी केले. ह्यात उद्धव ठाकरेंची प्रगल्भता दिसली. सदर स्मारक समितीमध्ये पवारसाहेबांनी लताबाईना घेण्याची सूचना केली असे समजले! मंगेशकरांची मागील भूमिका मनात न ठेवता पवार साहेबांनी दाखविलेला हा मनाच्या मोठेपणा महत्वपूर्ण आहे. हि सामाजिक जाणीव सर्वांनी ठेवायला हवी.

सचिनच्या निवृत्तीनिमित्ताने झालेल्या पार्टीला विनोद कांबळी उपस्थित नव्हता हि बातमी पहिली होती. त्या पार्टीला सचिनच्या जवळचे, सहकारी क्रिकेटपटू , स्टार, राजकारणी, इ. झाडून सगळे मान्यवर उपस्थित राहतात मग कांबळी का नाही हा मुद्दा लक्षात घ्या. मध्यंतरी विनोदने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीच्या अपयशाबद्दल बोलताना सचिन ने त्या अडचणीच्या काळी आपल्याला 'मदत' केली नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. हे जर विनोदच्या पार्टीला न येण्याचे कारण असेल तर हि दुर्दैवाची बाब आहे. सचिन ने 'चूक' केली असे म्हणावे लागेल. विनोदच्या तळतळाट गैर-वाजवी नाही कारण तो सिस्टम चा  बळी ठरला हे उघड सत्य आहे. द्रविड-गांगुली-लक्ष्मण ह्यांची कारकीर्द बहरत असताना विनोद अक्षरश: खड्याप्रमाणे बाहेर  फेकला गेला होता. म्हणून सचिनने त्या वक्तव्याचा राग धरून बसणे उचित नाही. तसे असेल तर, सचिन १९४ वर खेळत असताना डाव घोषित करणाऱ्या द्रविड-गांगुलीचे काय? अर्थात हा केवळ अंदाज आहे, तथ्य काय आहे ते विनोद आणि सचिन लाच ठाऊक!

कालच्याच बातमीत न्यायालयाने मुंबई क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष शरद पवार ह्यांच्या  कामकाजावर बंदी आणून गोपीनाथ मुंडे ह्यांच्या बाजूने निर्णय दिला. खरे पाहता मुंडे ह्यांना निवडणूक लढविण्यापासून रोखण्याचे काही कारण नव्हते. पवारसाहेबच विजयी झाले असते. परंतु काहीतरी तांत्रिक बाबीचा बागुलबुवा उभा करून मुंडेंच्या निवडणूक लढविण्याच्या अधिकारावरच गदा आणली गेली. लोकशाहीची मुस्कटदाबी करायचा तो सोयीस्कर प्रयत्न होता. न्यायालयाने त्याला चपराक देऊन पवारसाहेब आणि MCA  ह्यांची 'चूक' होती हे दाखवून दिले!

वरील सर्व उदाहरणे हि तथाकथित अभिजन वर्गाने केलेल्या चुकांची किंवा चूक-दुरुस्तीची आहेत.   समाजशास्त्राप्रमाणे बहुजन-अभिजन हे जे अभिसरण होत असते त्यातून घडलेला हा अभिजनवर्ग आहे. आपल्या समाजात क्रिकेट-सिनेमा-राजकारण ह्या क्षेत्रात हे अभिसरण अधिकच वेगाने होत असल्याचे चित्र आहे. अभिजन वर्गाने बहुजन वर्गापुढे आपल्या कर्तुत्वाने, विचाराने आदर्श निर्माण करावा जेणेकरून बहुजन वर्ग त्यांना अनुसरून वाटचाल करू शकेल. तरच ते अभिसरण यशस्वी होत राहील.
 

Saturday, 16 November 2013

क्रिकेटसन्यासा नंतर सचिन ने काय करावे?

 16/11/2013 (फेसबुक पोस्ट )

शेवटी सचिन निवृत्त झाला. त्याची शेवटची कसोटी गाजली ती त्याच्या भावनोत्कट निवृत्तीसाठीच. संपूर्ण देशच नव्हे तर अवघे क्रिकेट विश्व सचीनोत्सवात सामील झाले. ज्या खेळ पट्टीवर त्याने २४ वर्षे राज्य केले त्याच २२ यार्डाच्या खेळ पट्टीला अभिवादन करून त्याने क्रिकेटचा निरोप घेतला. एक डाव संपला...पण आता दुसरी इनिंग सुरु होणार हे देखील ओघाने आलेच!

क्रिकेटसन्यासा नंतर सचिन ने काय करावे? ह्याच्या चर्चा सुरु झाल्यात.
त्याने शास्त्री, गावस्कर प्रमाणे समालोचक व्हावे का?
त्याने कपिल, श्रीकांत प्रमाणे व्यावसायिक व्हावे?
कि त्याने सनी डेज सारखे एखादे पुस्तक लिहावे?
त्याने वेंगसरकर प्रमाणे क्रिकेट अकादमी चालू करावी?
चर्चा अशीच आहे कि त्याने क्रिकेट संबधित काहीतरी करीत राहावे.
सचिन देखील म्हणतो क्रिकेट माझा ऑक्सिजन आहे! अंजली म्हणते कि सचिन शिवाय क्रिकेट चा विचार करू शकते पण क्रिकेट शिवाय सचिनचा विचार ती करू शकत नाही!
इथेच माझ्या मते टर्निंग पोइन्ट आहे!

जे इतर सर्वांनी केले तेच सचिन ने करावे का? कि सचिन ने काही परिवर्तन घडवून आणावे?
क्रिकेट ह्या खेळाने सचिनला सर्व काही दिले आहे. अफाट श्रीमंती, प्रसिद्धी, प्रेम, इ. सर्व काही...
आता परत त्यातून काहीतरी मिळवण्याची अपेक्षा केली तर तेही सहज शक्य आहे. इतर सर्वजण ते करीत आहेतच.
मला वाटते कि इथेच सचिनचे वेगळेपण उठून दिसल्याशिवाय राहणार नाही.

आपल्या देशात क्रिकेट आणि सिनेमा ह्या दोन प्रचंड व्याप असलेल्या एन्टरटेनमेंट इंडस्ट्री आहेत. शे-सव्वाशे करोड लोकांच्या देशात क्रिकेट आणि सिनेमा ह्या क्षेत्रातील स्टार लोकांची प्रचंड रेलचेल आहे. अर्थातच ह्या सर्व स्टार ना महानियता मिळवून देण्याचे काम ह्या देशातील लोकांचे आहे. भारतीय समाजाचे ते श्रेय आहे हे वादातीत सत्य आहे!

परंतु दुर्दैवाने असे दिसून येते कि क्रिकेट आणि सिनेमा क्षेत्रातून प्रचंड यश, प्रसिद्धी, संपत्ती मिळवून देखील हे तथाकथित स्टार ज्या समाजाने आपल्याला महानतां दिली त्या समाजाला विसरून जातात.
सामाजिक ऋण आणि त्याची परतफेड अशी समाज भावना कुठेही दिसून येत नाही. ह्या कृतघ्नते मुळे त्यांच्यावर समाजाचा रोष देखील आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्टीव वौ आपल्या देशात येउन काही सामाजिक कार्य करताना दिसतो परंतु आपले क्रिकेटपटू क्वचितच अशा कार्यात दिसून येतात हि खेदजनक बाब आहे. कपिलदेव, गावस्कर सारखे महान क्रिकेटपटू सामजिक कार्यापासून अलिप्तच राहताना दिसून येतात.

एखादा सलमान खान क्वचित काही सामाजिक कार्य करताना दिसतो परंतु सिनेमा क्षेत्रातून समाजाप्रती उदासीनताच जास्त दिसून येते. अमिताभ राजकारणात थोडासा येतो पण परत सिनेमाच्या च मागे आयुष्य व्यतीत करतो. दिलीपकुमार, लता मंगेशकर, सारखे प्रथितयश कलाकार देखील अभिनय, गायन, संगीत, इ. पलीकडे सामाजिक विचार करताना दिसत नाहीत, हि शोकांतिकाच आहे!

सचिन तेंडूलकर ह्या महान खेळाडूने इथे बदल घडवून आणावा अशी अपेक्षा आहे. कदाचित हे परिवर्तन त्याच्याच हस्ते घडून येण्याचे विधिलिखित असावे!

जर सचिन ने सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात भरीव कार्य करायचे ठरवले तर त्यात तो यशस्वी होणार ह्या कुणालाही शंका नसावी. त्याचे कारण म्हणजे ह्या माणसाची निष्ठा, एकाग्रता आणि प्रचंड मेहनत कार्याची तयारी. त्यामुळेच तो क्रिकेट मध्ये देखील देवपण प्राप्त करू शकला.
कार्य-निष्ठा अशी कि तो रात्री झोपू शकत नाही कारण दुसर्या दिवशी फलंदाजी करायची असते!
निस्वार्थी वृत्ती अशी कि तो गांगुली ला किंवा धोनी ला कर्णधारपद देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली खेळतो!

तो राज्यसभेचा खासदार आहेच, त्याने लोकसभेची निवडणूक लढवावी, राजकारणात झोकून द्यावे. त्या क्षेत्रात आपला प्रभाव पडावा. परिवर्तन घडवावे. त्याद्वारे सामाजिक ऋण फेडावे! असे माझे मत आहे.

इथेही स्पर्धा असेल. इथे स्लेजिंग होईल. चेंडू कुरतडल्याचे खोटेनाटे आरोप होतील. अझर-मोंगिया पाय ओढतील. कुणीतरी सायमंड जातीयवादाचे वितंड घालतील. एखादा जयवंत लेले आधीच पनौती लावेल! पण सचिन ह्या सर्वाना पुरून उरेल, हे नक्की!

Monday, 28 October 2013

मोदींचा 'इतिहास'

 28/10/2013 (फेसबुक पोस्ट )

सिकंदरच्या विश्वविजेत्या सैन्याचा पराभव बिहारच्या भूमीवर बिहारींनी केला असे वक्तव्य मोदिनी केले , त्याबद्दल....

सिकंदरने इ.स.पूर्व ३२६ मध्ये सिंधू नदी ओलांडून भारतावर आक्रमण केले. त्याने पंजाब मध्ये राजा पोरसला पराभूत केले परंतु पोरसच्या शौर्याने सिकंदर थक्क झाला. इथेच त्याच्या सैन्याने पुढे जाण्यास नकार दिला.
सिकंदर इ.स.पूर्व ३२३ मध्ये परतीच्या मार्गावर बाबिलोन इथे मृत्यू पावला.


मगध (बिहार) मध्ये तेव्हा नंद साम्राज्य होते आणि ते भारतातील सर्वात शक्तिशाली राज्य होते.
चंद्रगुप्ताने इ.स.पूर्व ३२१ मध्ये नंद साम्राज्याचा पराभव केला.
चंद्रगुप्ताने इ.स.पूर्व ३०५ मध्ये सेलुकस निकेटर चा पराभव केला.
अर्थात सिकंदर किंवा अलेक्झांदर द ग्रेट ह्याचा मगध साम्राज्याशी युद्ध किंवा लढाई व्हायचा प्रश्नच उद्भवला नाही.


चंद्रगुप्ताने नंद साम्राज्य ताब्यात घेऊन ग्रीक सत्रापाना आणि सेलुकस निकेटर ला परास्त करण्याचा पराक्रम सिकंदरच्या मृत्युनंतर केला आहे.


म्हणून बिहारने (मगध) सिकंदरला पराभूत केले असे म्हणणे चुकीचे आहे. कारण सिकंदरचा नंद किंवा चंद्रगुप्त ह्यापैकी कुणाशीही संघर्ष झालाच नाही !
असो...


मोदींचे इतिहासाचे ज्ञान किंवा आकलन चुकीचे असू शकते आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता निवडून येण्याची क्षमता आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता ह्या बाबी जास्त महत्वाच्या असल्याने 'ज्ञान' हा निकष फारसा महत्वाचा राहिलेला नाही. अशा ज्ञान विषयक मुद्द्यावर तथाकथित पंतप्रधान पदाच्या उमेदवारांचे बुरखे फाटले तर त्यात काही विशेष नाही;
 
...चालायचेच...समजून घ्या...

Thursday, 10 October 2013

सचिन निवृत्त होतोय....



 10/10/2013 (फेसबुक पोस्ट )
"I have seen God, he bats at no. 4 for India." -Matthew Hayden.
क्रिकेटचा देव निवृत्त होतोय.

सचिन निवृत्त होतोय....

निवृत्तीची हि प्रक्रिया बराच काळ सुरु होती. आधी एकदिवसीय सामन्यातून, मग IPL मधून, आत्ताच चाम्पियन्स लीग मधून आणि आज अखेर कसोटी मधूनही निवृत्तीची घोषणा. एक पर्व नव्हे एक युग संपतेय.

गावस्करच्या निवृत्तीने एक पर्व संपले होते तेव्हा क्रिकेट विश्वात सचिन चा उदय झाला. २५ वर्षांनी हे युग सरतेय.

सचिन म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे सचिन अशा झपाटलेल्या काळाचे आम्हीही साक्षीदार.

सुरुवातीच्या एकहाती सामने जिंकण्या पासून ते पुढे द्रवीड-गांगुली-लक्ष्मण ह्याना घेऊन जगात भारताचा दबदबा निर्माण करण्यापासून ते धोनीच्या यंग ब्रिगेडचा मार्गदर्शक पर्यंत चा सचिनचा प्रवास एकमेवाद्वितीयच.

आत्यंतिक अपेक्षांच्या बोज्यातून, कर्णधारपदाच्या ओझ्यातून, सततच्या दुखापतीमधून, फीक्सिंग च्या मनस्तापातून तो नेहमीच तावून सुलाखून पुढे जात राहिलाय.

लारा, वॉ, इंझमाम, पोंटिंग, इ. कुणीही समकालीन खेळाडू त्याच्या स्पर्धेत आम्ही सहन केला नाही. आणि टीकलाही नाही.

म्याकग्रा, डोनाल्ड, अक्रम इ. त्याला त्रासदायक ठरताना देखील आम्ही ठाम राहिलो आणि तेही टिकू शकले नाहीत.

२००४-०५ ची गोष्ट आहे. तेव्हा त्याची २५-३० शतके दोन्ही क्रिकेटमध्ये होती. माझ्या एका मित्राबरोबर मी पैज लावली होती कि सचिन १०० शतके करेल तसेच एकदिवसीय आणि कसोटी दोन्हीमध्ये ५०-५० शतके करेल. रु. १०,०००/- ची पैज.

आज त्याची शतके ४९ आणि ५१ आहेतच. म्हणजे १०० पूर्ण. १ शतक ट्वेंटी-२० मध्ये आहे.
पैज मी जिंकलो कि हरलो हे तुम्हीच ठरवा कारण वरील आकडेवारी तून उलट-सुलट निष्कर्ष निघतील...

पण सचिन नक्की जिंकला, क्रिकेट जिंकले आणि माझ्यासारखे चाहते हि सतत जिंकत राहिले.

कदाचित येत्या विश्व चषकासाठी त्याची गरज पडली तर तो पुन्हा येईल हि...(एक वेडी अपेक्षा !)

तोपर्यंत अलविदा सचिन.

Monday, 7 October 2013

नवा 'इझम' जन्माला येणे क्रमप्राप्त आहे



धर्म हि संकल्पना जशी कालबाह्य झाल्याचे दिसून येते, तीच गत सध्या काही सामाजिक आणि राजकीय विचारधारांची झालेली दिसते. अर्वाचीन  भारताचा इतिहास पाहता गांधीझम, सावरकरीझम आणि आंबेडकरीझम  असे तीन विचारप्रवाह सामान्यपणे देशात दिसून येतात.

१. गांधीझम च्या  तिरंगा चा मक्ता सेकुलर राजकारण करणाऱ्या काँग्रेस आणि तत्सम तथाकथित सेकुलर वाद्यांनी घेतलाय.
२. सावरकरीझम चा भगवा झेंडा हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या संघ, भाजप ह्या राजकीय पक्षांनी तसेच विश्व हिंदू परिषद  इ. हिंदू धर्म संघटनानी खांद्यावर घेतला आहे.
३. आंबेडकरीझमचा निळा बावटा रिपब्लिकन, बसप, इ. राजकीय पक्षांनी आणि बौद्ध-नवबौद्ध समाजाने धारण केला आहे.

वरील तिन्ही विचारधारा मधील परस्परविरोधी ब्रिटीश काळापासून ते आजच्या स्वतंत्र भारत देशात सतत दिसून येतो. हा परस्परविरोध ब्रिटीश सरकारशी झालेल्या स्वातंत्र्य लढ्यात दिसून येतो तसेच ब्रिटीश सरकार शी वेळोवेळी होणार्या अनेक वाटाघाटी, कायदे मंडळे , इ. संदर्भात दिसून येतो.


ज्या काळात ह्या तिन्ही विचारधारा त्यांच्या निर्मात्यांनी मांडल्या त्या १०० वर्षापूर्वीच्या भारताचा विचार केल्यास तत्कालीन राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेच्या दृष्टीने विचार करूनच त्या विचार प्रणाल्या अस्तित्वात आल्या हे दिसून येते. त्यातून राष्ट्र-समाज-धर्म अशा विविध स्तरावर मानवी जीवन समृद्ध करण्याची सामान्य अपेक्षा असणारच.

इथे जिनाइझम च्या हिरव्या झेंड्याचा हि उल्लेख करावा लागेल ज्यांनी पाकिस्तान-मुस्लिम  ह्या राष्ट्र-धर्म वादासाठी कार्य केले परंतु स्वतंत्र भारताशी ह्या विचारधारेचा फारसा संबंध नसल्याने इथे त्याची चर्चा सयुक्तिक होणार नाही. तसेच सोशलीझम, कमुनिझम इ. मरणासन्न विचारधारा देखील चर्चेत नको.

असे दिसतेय कि ब्रिटीश काळातील ह्या तीन विचारधारा आजही तो  परस्परविरोध सोडत नाहीयेत. स्वातंत्र्य ,लोकशाही आणि राज्यघटनेची व्यवस्था देखील हा परस्परविरोध दूर करण्यात अयशस्वी झाली आहे. उलटपक्षी हा विरोध दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे.

विविध धर्म आणि त्यांचे  देव-प्रेषित ह्यांच्या मधून जसा आजही विस्तव जात नाही तीच परिस्थिती ह्या विचारधारांची आहे. राजकीय स्वार्थ सोडल्यास ह्या विचारधारा परस्पर सौहार्द जपताना दिसत नाहीत. त्याची परिणीती त्यांच्या अनुयायी वर्गाची एकमेकाविषयी असलेली द्वेष-संशयी वृत्ती बळावून स्वातंत्र्य-समता-बंधुता ह्या मूळ तत्वांचा तिलांजली देण्यात होते.

गांधी वाद्यांना सावरकर चालत नाही. आंबेडकर पटत नाही. सेकुलर तिरंग्याला गांधी सोडून इतर जमत नाहीत. त्यांचा गांधी हा देव. इतर दोघे अनुच्चाराने लांबच ठेवण्याची त्यांची प्रवृत्ती.

हिंदुत्व वाद्यांना गांधी-आंबेडकर अजूनही परके वाटतात. भगव्या झेंड्याचे अनुयायी ह्या दोघांना आजही शिवीगाळ करण्यातच धन्यता मानतात. त्यांच्यासाठी सावरकर मात्र देव. इतकेच नाही तर गोडसे देखील त्यांना देव म्हणून चालतो. पण गांधी-आंबेडकर मात्र त्याज्य!

आंबेडकर वाद्यांना गांधी अजिबात चालत नाही. सावरकरही नाही. निळ्या झेंड्याला आंबेडकर पलीकडे काही दिसत नाही. त्यांचा आंबेडकर हा देव. इतर दोघांना ठाम नकार!

खरे पाहता ह्या तिन्ही विचारधारा स्वतंत्र भारताचा ६५ वर्षाचा इतिहास पाहता त्यांच्या निर्मात्यांच्या नंतर पराभूतच  झाल्या आहेत. आणि त्यांचे अनुयायी किंवा समर्थक हेच त्याला कारणीभूत आहेत.

आपापले निर्माते महापुरुष 'देव' बनवून आणि त्या विचारधारेला 'धर्म' बनवून त्या संकल्पना कालबाह्य कशा होतील हेच आपण पाहत आलो.

परिवर्तनशीलता हा निसर्गाचा नियम आहे परंतु इथे बदल घडण्याची शक्यता च नाही. सारे काही जैसे थे. धर्म-देव जसे दोन-तीन हजार वर्षापूर्वीचे विचार-तत्वज्ञान पांघरून जुनाट बुरसटून राहिल्यात त्याचप्रमणे ह्या विचार प्रणाल्या देखील कालबाह्य होत आहेत. कारण देव आणि धर्म ह्यांना चिकित्सा आणि परिवर्तन सहसा मान्य होत नाही !

हे तिघेही निर्माते जर आज अस्तित्वात असते तर त्यांनी आजच्या राष्ट्र आणि समाज हिताच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलून नवे विचार मांडून ह्या विचार धारा ची पुनर्रचना केली असती. अथवा जर अनावश्यक असतील तर बरखास्त देखील केल्या असत्या. उदा. गांधीजींची कॉंग्रेस बरखास्त करण्याची सूचना.

आजच्या परिस्थितीचा विचार केल्यास ह्या तिन्ही विचारधारेच्या अनुयायाना परिवर्तनशील राहून नव्या कालानुरूप बदल घडवून ह्या विचारधारांचे आधुनिकीकरण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. अन्यथा व्यवहारी राजकारणाच्या दावणीला बांधून घेऊन त्यांचा अंत निश्चित आहे.
 
राजकारणाचा विचार केल्यास ह्या प्रमुख विचारधारांचा आजवरचा प्रवास हा निराशामय असल्याचे चित्र आहे अन्यथा आज सगळीकडे प्रादेशिक पक्षांचा सुळंसुळाट आणि आघाडी सरकारांचे चित्र दिसले नसते. तसेच समाजामध्ये गांधीवादी, हिंदुत्ववादी आणि आंबेडकरी जनतेमध्ये अशी उभी फूट पडली नसती.  

ह्या विचारधारांशी बांधिलकी असणारे जे विद्वान बुद्धिमंत, विचारवंत आहेत त्यांनी ह्या विनाश घंटेची दखल घेऊन राष्ट्र आणि समाज हिताच्या व्यापक दृष्टीकोनातून योग्य पाऊले उचलणे काळाची गरज आहे कारण नवा 'इझम' जन्माला येणे क्रमप्राप्त आहे.

राकेश पाटील.

Tuesday, 3 September 2013

संजय सोनवणी...एक तरुण झंझावाती अवलिया !



संजय सोनवणी...एक तरुण झंझावाती अवलिया !


तीन वर्षापूर्वी बोरीवली (पश्चिम) इथे जुन्या पुस्तकांच्या दुकानातून काही पुस्तके घेतली पण ती आमच्या गावी नेउन ठेवली होती. काही दिवसापूर्वी गावी गेलो होतो तेव्हा दुपारी त्यातील एक पुस्तक वाचायला घेतल. 'मृत्युरेखा' लेखक : संजय सोनवणी! सुखद झटका. राजीव गांधीची हत्या आणि तमिळ टायगर्स च्या तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे चित्र रेखाटणारी कादंबरी.

दोन वर्षापूर्वीची अशीच एक घटना. मला ऐतिहासिक पुस्तके आवडतात म्हणून माझी पत्नी सौ. प्रीती हिने पालघर कॉलेजच्या ग्रंथालयातून एक पुस्तक मला आणून दिलं होत. 'The  Awakening' चा मराठी अनुवाद. संजय सोनवणीनि मृत्यू सारख्या गूढ गहन विषयावर राणी शिबाच्या माध्यमातून किती बोधक तत्वचिंतन केले आहे  आणि तेही इंग्रजीमध्ये !

मित्रानो, माझी सोनवणी सरांशी ओळख झाली ती फेसबुक च्या माध्यामतून. मी पेशवाई कालीन  इतिहासातील काही विषयावरून चर्चा करीत असताना संजय सरांनी माझी कमेंट like केली आणि अहो आश्चर्यम! ती चर्चा सोडून वाद घालणार्यांनी पळ काढला. मग त्यांच्या ब्लॉग चा मी एक वाचक बनलो नाही तर नवलच!  'पानिपत असे घडले' ह्या ग्रंथा विषयी चर्चा करताना संजय क्षीरसागर ह्यांच्याकडून श्री.सोनवणी ह्यांच्यातील प्रकाशकाविषयी समजले. पण सरांशी चर्चा करायचा योग येत नव्हता. मध्यंतरी एकदोन वेळा दूरदर्शनवरील चर्चेमध्ये त्यांचे विचार ऐकण्याचा मात्र योग आला.

हि दोन्ही पुस्तके अशी अचानक माझ्या वाचनात आली आणि मी धन्य झालो. आजही मी त्यांचा ब्लॉग आणि त्यातील ते सर्वंकष लेखन ह्याचा फार मोठा चाहता आहे. जाती आणि जातीसंस्थेचा इतिहास, हिंदू आणि वैदिक धर्म, संस्कृत आणि प्राकृत भाषा ह्या विषयावरील त्यांचे संशोधनात्मक लेख, इ. मुळे मी त्यांच्या सानिध्यात कधी आलो ते कळलेच नाही. मग फेसबुक वरून केलेल्या चर्चा, नंतर फोन करून झडलेले संवाद आणि अलीकडे सर मुंबईला आले तेव्हा झालेली प्रत्यक्ष भेट.

सोनवणी सरांच्या  साहित्यक्षेत्राची भरारी ऐतिहासिक, सामाजिक, संशोधनात्मक, थरार, विज्ञान, तत्वज्ञान, नीतिशास्त्र, विश्वनिर्मिती शास्त्र, समाजशास्त्र, काव्यसंग्रह, नाटके  अशा विविध साहित्य प्रकारात तसेच शेती, शिक्षण, अर्थकारण, सामाजिक, आंतरराष्ट्रीय अशा बहुविध विषयात त्यांचे विपुल लेखन प्रकाशित झाले आहे. मराठी तसेच इंग्रजी ह्या दोन्ही भाषेत त्यांची साहित्यसंपदा  ८० ग्रंथांच्या रूपाने प्रसिद्ध झाले आहे.



पुरस्कारांसाठी पुस्तके पाठवीणे हा लेखकाचा अपमान आहे असे त्यांचे ठाम मत असल्याने त्यांनी स्वत:वर आणि त्यांच्या प्रकाशकांवर "पुरस्कारांसाठी पुस्तके पाठवायची नाहीत." असे बंधन घातल्यामुळे त्यांना एकही साहित्य पुरस्कार मिळालेला नाही! असा हा प्रथितयश सिद्धहस्त साहित्यिक आणि प्रकाशक ८७व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा आहे.

मराठी वाचक-साहित्यिकांचे संवर्धन करणे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी जन आंदोलन उभारणे, राज्य सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणी साठी प्रयत्न करणे, प्रशासकीय मराठीत सुधारणा करणे हि त्यांची भूमिका देखील मराठी साहित्य संस्कृती ला अंतर्बाह्य बदलाच्या दिशेने नेणारी आहे. अशा ह्या क्रांतिकारक साहित्यिकाला ह्या निवडणुकीत सुयश लाभो आणि त्या निमित्ताने मराठी साहित्य परंपरेला नव्या उंचीवर नेण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त होवो हीच सरस्वती चरणी प्रार्थना!

राकेश पाटील. 

( टीप: सदर लेख सोनवणी सरांना दाखवून पोस्ट करणार होतो परंतु ते दौऱ्यावर असल्याने शक्य झाले नाही. म्हणून शब्दयोजना, वाक्यरचना, माहितीसंबंधी काही चूकभूल असल्यास क्षमस्व.)




संजय सोनवणी: प्रकाशित साहित्य

ऐतिहासिक कादंब-या: 
अखेरचा सम्राट (२ आवृत्त्या), ...आणि पानिपत, कुशाण (२ आवृत्त्या) क्लिओपात्रा (७ आव्रुत्त्या)
 
तत्वज्ञानात्मक कादंब-या: 
शुन्य महाभारत (२ आवृत्या), कल्की (३ आवृत्त्या), यशोवर्मन (४ आवृत्त्या)
 
सामाजिक कादंब-या: 
सव्यसाची (२ आवृत्त्या), काळोख (२ आवृत्त्या), खिन्न रात्र (३ आवृत्त्या), विकल्प (३ आवृत्त्या), खळबळत्या सागरकाठी (२ आवृत्त्या), अखेरचे वादळ (३ आवृत्त्या)
 
पौराणिक कादंब-या:
अश्वत्थामा (६ आवृत्त्या), ओडीसी (३ आवृत्त्या)
 
थरार-कादंबर-या: 
म्रुत्युरेखा (५ आवृत्त्या), विश्वनाथ (२ आवृत्त्या), अंतिम युद्ध (३ आवृत्त्या) ब्लडी आयलंड, शिल्पी (२ आवृत्त्या), रक्तराग (२ आवृत्त्या), महाद्वार (३ आवृत्त्या), अंतिम युद्ध (३ आवृत्त्या), वार टाईम (३ आवृत्त्या), पराभव (३ आवृत्त्या), अपहरण (४ आवृत्त्या),
 
सांस्क्रुतीक थरार: 
असूरवेद (३ आवृत्त्या)
 
वैद्यकीय कादंबरी: 
थेंब...थेंब म्रुत्यू...(३ आवृत्त्या) (एड्सवरील भारतातील पहिली कादंबरी.)
 
राजकीय थरार: 
बिजींग कोन्स्पिरसी (२ आव्रुत्त्या), रक्त हिटलरचे, (३ आव्रुत्त्या), ब्ल्यकमेल (२ आवृत्त्या), डेथ ओफ़ द प्राइममिनिस्टर (४ आवृत्त्या),
 
राजकीय उपहास: 
गुडबाय प्राइममिनिस्टर, आभाळात गेलेली माणसं (३ आवृत्त्या)
 
वैज्ञानिक संशोधन: 
अवकाश ताण सिद्धांत आणि विश्वनिर्मिती
 
तत्वज्ञान: 
नीतिशास्त्र, ब्रह्मसूत्र रहस्य
 
इतिहास संशोधन: 
हिंदु धर्माचे शैव रहस्य, (३ आवृत्त्या) विट्ठलाचा नवा शोध, भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर, (तीन आवृत्त्या) महार कोण होते?...उद्गम:संक्रमण:झेप, , प्राचीन आर्यांचे धार्मिक तत्वद्न्यान, वाघ्याचे सत्य.
 
सामाजिक/वैचारिक: 
मुंबई २६/११...पुर्वी आणि नंतर, (दोन आवृत्त्या) प्रेम कसे करावे? (६ आवृत्त्या), सद्दाम हुसेन: एक झंझावात, कार्पोरेट व्हिलेज- एक गांव:एक कंपनी:एक व्यवस्थापन, दहशतवादाची रुपे
 
काव्य संग्रह: 
प्रवासी, पर्जन्यसुक्त, संतप्त सुर्य
 
नाटक: 
मीच मांडीन खेळ माझा, राम नाम सत्य हे!, विक्रमादित्य, रात्र अशी अंधारी, गड्या तु माणुसच अजब आहेस, त्या गावाचं काय झालं?
 
बाल/किशोर साहित्य: 
रानदेवीचा शाप, साहसी विशाल, रे बगळ्यांनो, सोन्याचा पर्वत (चार आवृत्त्या), दुष्ट जोनाथनचे रहस्य, रत्नजडीत खंजिराचे रहस्य, सैतान वज्रमुख, अंतराळात राजु माकड, नरभक्षकांच्या बेटावर विजय.(तीन आवृत्त्या),
 
इंग्रजी: 
Death of the prime minister
On the brink of Death (3 Editions.)
The mattalions (2 Editions)
The Jungle (3 Editions)
Last of the wanderers (3 Editions)
The Awakening
Dancing with the Rains (Full length play)
Raging Souls
Heart of the Matter (full length play)
Monsoon Sonata (Poetry)
Ancient Aryan's Thought on Religion

 
अन्य:

संगीत: 
मनात माझ्या (गीत-संगीत-गायन), ओ जानेजां (गीत-संगीत. गायक- नितीन मुकेश), इट्स माय ड्रीम (संगीत-गीत), अखेरचे वादळसाठी गीतलेखन, संगीत...गायिका उषा मंगेशकर.
 
संकीर्ण: 
किर्लोस्कर ते अन्य अनेक मासिके, साप्ताहिके व दैनिकांत शेकडो लेख. ब्लोगवरील प्रकाशित लेखसंख्या ४५०. 
 

आगामी: 
हिरण्यदूर्ग, जातिसंस्थेचा इतिहास.